पाकिस्तान आणि बांगलादेशचे राष्ट्रगीत पाठ करा!; झारखंडमधील शाळेचा गृहपाठ

Online Education

घाटशिला :- कोरोनाच्या साथीमुळे शाळा बंद आहेत. ऑनलाईन वर्गात विध्यार्थ्यांना काही उपक्रम (गृहपाठ) देण्यात येतात. यात झारखंडमधील पूर्व सिंहभूममधील घाटशिला येथील शाळेने विद्यार्थ्यांना पाकिस्तान आणि बांगलादेशचे राष्ट्रगीत पाठ करण्यास सांगितले!

या गृहपाठामुळे पालक संतापले, याचा निषेध केला. भाजपाने यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि शाळेच्या व्यवस्थापनाविरोधात घाटशिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, व्यवस्थापनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते बाबूलाल मरांडी यांनी मुख्यमंत्री सी. हेमंत सोरेन यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

शालेय जिल्हा शिक्षणाधिकारी शिवेंद्र कुमार म्हणाले की, शाळेला नोटीस पाठविण्यात आली आहे. उपायुक्त यांच्या आदेशानुसार बीडीओच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. समितीचा अहवाल मिळाल्यानंतर शाळेच्याविरुद्ध कारवाई करू.

भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित सिंह यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने शाळा व्यवस्थापनाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार केली आहे. भाजपा व पालकांनी उपायुक्तांकडे तक्रारही केली आहे. भाजपाचे राज्य सरचिटणीस आदित्य साहू म्हणाले की, असे गृहपाठ शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या देशविरोधी मानसिकता प्रतिबिंबित करते.

शाळेचा खुलासा
याबाबत खुलासा करताना प्राचार्य संजय मल्लिक म्हणाले की – मुलांचे सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी भारताच्या शेजारी देशांच्या विषयावर एक प्रकल्प देण्यात आला होता. या अंतर्गत शेजारच्या देशांशी आणि त्यांच्या संस्कृतीशी संबंधित काही माहिती, राष्ट्रीय गाणी, राष्ट्रीय चिन्हे, फुले, प्राणी इत्यादींची माहिती देण्याचा प्रयत्न केला जात होता. इतर कोणताही उद्देश नव्हता. मात्र पालक आणि नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन हा प्रकल्प शाळा व्यवस्थापनाने रद्द केला आहे. घडलेल्या प्रकारामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या तर त्याबद्दल शाळा व्यवस्थापनाकडून आम्ही क्षमा मागतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER