भाजपचे धक्कातंत्र, मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी

BJP-Shiv Sena

मुंबई :- नीरस, एकतर्फी वाटणाऱ्या पश्चिम उपनगरातील निवडणुका भाजपच्या धक्कातंत्रामुळे आणि बंडखोरांमुळे रंगतदार बनल्या आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना उमेदवारी नाकारण्याची घटना धक्कादायक असली तरी त्यामुळे निकाल अथवा पक्षशिस्तीची घडी बदलेल याची सुतराम शक्यता नाही. याशिवाय, बंडखोरांमुळे किमान तीन जागांवर विद्यमान आमदारांची डोकेदुखी वाढली आहे.

उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील या तीन लोकसभा मतदारसंघात एकूण १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील बहुतांश  जागा या पश्चिम उपनगरात मोडतात. भाजप आणि शिवसेनेने इथे आपले चांगलेच बस्तान बसविले आहे. २०१४ साली या १८ जागांमध्ये काँग्रेसला कशाबशा दोनच जागा  राखता आल्या. यंदाही यात विशेष बदल होईल अशी स्थिती नव्हती. मात्र, तीन ठिकाणच्या बंडखोरांमुळे सहज वाटणाºया लढती अटीतटीच्या बनल्या आहेत. वांद्रे पूर्वेत विद्यमान शिवसेना आमदार तृप्ती सावंत यांनी बंडाचे निशाण फडकावल्याने काँग्रेस उमेदवार झिशान सिद्दीकी यांच्या आशा उंचावल्या आहेत. काही वर्षापर्यंत राजकारणात नवख्या असणाऱ्या सावंत यांच्या बंडाला ‘मातोश्री’ला जवळ असणाऱ्या काही ताकदवान नेत्यांचीच फूस असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विश्वनाथ महाडेश्वर यांच्या मार्गातील अडथळे मात्र वाढले आहेत. तर, राजुल पटेल यांची बंडखोरी वर्सोवा येथील विद्यमान आमदार भारती लव्हेकर यांच्यासाठी तापदायक झाली आहे. बंडखोरी खपवून घेणार नसल्याचा इशारा महायुतीतील ज्येष्ठ नेत्यांनी दिला असला तरी स्थानिक शिवसेना राजुल पटेल यांच्याासोबत असल्याचे चित्र आहे. लव्हेकर यांच्या प्रचारातून शिवसैनिक गायब झाल्याने अघोषित असहकार इथे पाहायला मिळत आहे. आधीच कॉंग्रेसला पूरक असणाऱ्या या मतदारसंघात पटेल-लव्हेकर यांच्या वादात काँग्रेसचे बलदेवसिंग खोसा बाजी मारणार का, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष्य लागले आहे.  तर, भाजपच्या मुरजी पटेल यांच्या बंडखोरीने अंधेरी पूर्वचे विद्यमान आमदार आणि शिवसेनेचे रमेश लटके यांचा प्रवास बिकट झाला आहे.

बंडखोरांनी चर्चेत आलेले हे तीन मतदारसंघ वगळल्यास उर्वरित ठिकाणी आघाडी विरुद्ध युती अशी थेट लढत आहे. बोरीवलीत तावडे यांच्या जागी भाजपने सुनील राणे यांना उमेदवारी दिली आहे. राणे बाहेरचा अशी चर्चा एका गटाने सुरू असली तरी तावडेसुद्धा २०१४ साली बाहेरचेच होते. पक्षसंघटनेच्या जोरावरच इथला उमेदवार निवडून येणार हे स्पष्ट आहे. अशीच स्थिती उत्तर मुंबईतील बहुतांश मतदारसंघात आहे. चारकोप येथे योगेश सागर, कांदिवली पूर्वेत अतुल भातखळकर, अंधेरी पश्चिमेत अमित साटम, विलेपार्ले येथे पराग अळवणी या दिग्गज उमेदवारांनी आपापले मतदारसंघ मजबूत केले आहेत. दगाफटका होणार नाही यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. दहिसरमध्ये मनिजषा चौधरी यांना भाजपसोबत शिवसैनिकांनाही सोबत घ्यावे लागणार आहे. शिवसेनेने विनोद घोसाळकरांना श्रीवर्धनची उमेदवारी दिल्याने शिवसैनिकांना चौधरींना साथ देण्यात विशेष अडचण नाही. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी विधानसभेऐवजी परिषदेची गणिते जुळविण्यास सुरुवात केल्याने गोरेगावमध्ये विद्या ठाकूर यांचा मार्गही प्रशस्त झाला आहे. तर, वांद्रे पश्चिमेत दमदार विरोधकाच्या अभावी भाजप नेते आशिष शेलार यांचा मार्ग भलताच सुकर झाला आहे. येथील काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी निवडणुकीत माघार घेतली तर मुलगा झिशानला वांद्रे पश्चिमऐवजी पूर्वेत धाडल्याने शेलारांचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिवसेना आमदारांनी आपापल्या मतदारसंघात जुळवाजुळव सुरू केली आहे. परंपरागत शिवसेनेच्या मतांसोबत उत्तर भारतीय आणि गुजराती-मारवाडी मतांच्या बेगमीसाठी भाजप नेते, पदाधिकारी सोबत असतील, राहतील याची खबरदारी शिवसेनेच्या आमदारांकडून घेतली जात आहे. मागाठाणेत प्रकाश सुर्वे, जोगेश्वरी पूर्वेत रवींद्र वायकर, दिंडोशीत सुनिल प्रभू या दिग्गज शिवसेना आमदारांनी आपली सारी शक्ती पणाला लावली आहे. तर, कुर्ला येथे मंगेश कुडाळकर यांनी जय्यत तयारी केली आहे. राष्ट्रवादीचे मिलिंद कांबळे त्यांना आव्हान देण्याच्या प्रयत्नात असले तरी त्यांची सारी मदार मुस्लिम मतांवरच असणार आहे.

पश्चिम उपनगरात सध्या काँग्रेसचे दोन आमदार आहेत. त्यापैकी चांदिवली येथून नसीम खान यांनी आपला मतदारसंघ राखण्यासाठी जोरात तयारी केली आहे. शिवसेनेचे दिलीप लांडे यांनी आव्हान उभे करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, खंडीभर अपक्ष आणि छोटे उमेदवारांना रिंगणात उतरवून विरोधी मते कापायची असे विविध राजकीय डावपेच खेळण्यात नसीम खान वस्ताद आहेत. दोन दशके सत्तेत असल्याने तयार झालेली नाराजी राजकीय खेळीने निष्प्रभ करण्याची खान यांची मनिषा आहे. तर, मालाड येथे असलम शेख यांनाच उमेदवारी देण्याची नामुष्की काँग्रेसवर आली आहे. शेख हे भाजप आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याने तिकीट देणार नसल्याचा बाता काँग्रेस नेतृत्वाने केल्या होत्या. मात्र, दुसरा उमेदवारच नसल्याने शेवटी असलम शेख यांनाच उमेदवारी द्यावी लागली. त्यांच्याविरोधात भाजपने रमेशसिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. भाजप उमेदवार कमकुवत आणि बाहेरचा असल्याची चर्चा काही गटांनी चालविली आहे. राष्ट्रवादीसह, मनसे आणि वंचितला पश्चिम उपनगरात फार प्रभाव दाखविता येईल, अशी स्थिती मात्र नाही.

सध्याचे पक्षीय बलाबल
भाजप ९
शिवसेना ७
काँग्रेस २