मुख्यमंत्र्यांच्या गावातही बंडाचे झेंडे

badgeप्रत्येक निवडणुकीत बंडखोरी असते. पण यावेळी युतीमध्ये तिकीट वाटपाचे काय निकष होते ते कळायला मार्ग नाही. चहूकडे नाराजी नाट्य रंगले आहे. नाथाभाऊंचे तिकीट का कापले आणि मुख्यमंत्र्यांच्या पी.ए.ला का दिले? याचा व्यवस्थित खुलासा भाजपकडून होत नसल्याने अस्वस्थता आहे. कुणी हायवे रोखत आहे तर कुणी ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या बंगल्यावर धाव घेऊन मन मोकळे करत आहे. किमान ८-१० जागी मोठी नाराजी दिसते आहे. नवी मुंबईचे सम्राट राष्ट्रवादीतून आलेले गणेश नाईक यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या मुलाला पुढे यावे लागले. अशा खूप गंमतीजमती सुरु आहेत.

ही बातमी पण वाचा : कॉलर आणि मिशीची लढाई

युतीची पहिली यादी जाहीर होताच तिकीट न मिळालेल्यांचा असंतोष उफाळून आला आहे. उमेदवारी अर्ज भरून ज्येष्ठ नेते नाथाभाऊ खडसे यांनी पुकारलेल्या अघोषित बंडाचे लोण आज सर्वत्र पसरले. यादीवरील असंतोषाचा फटका खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना बसला. दादांना पुणे जिल्ह्यातील कोथरुडमधून उमेदवारी देण्यात अली आहे. पण ते बाहेरचे असल्याचे सांगून स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे मीच नव्हे तर माझी बायकोही पुण्याची आहे असे दादांना सांगावे लागत आहे. उदगीरच्या सुधाकर भालेराव यांच्या समर्थकांनी तर चंद्रकांतदादांची कार अडवून गोंधळ घातला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी पी. ए. अभिमन्यू पवार यांना लातूरमधील औसा येथून उमेदवारी दिल्याचा विरोध करीत संभाजी पाटील निलंगेकर यांच्या समर्थकांनी हायवे रोखून खळबळ उडवली.

मुख्यमंत्र्यांचे गृहनगर असलेल्या नागपुरात तिकीट कापल्याने आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांनी केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या बंगल्यावर धाव घेतली. नागपूर भाजपचे अध्यक्ष प्रवीण दटके यांना मध्य नागपुरातून तिकीट नाकारल्याने त्यांचेही समर्थक गडकरी यांच्याकडे धावले. त्यामुळे उपराजधानीचे राजकारण तापले आहे. सुधाकर कोहळे यांचे तिकीट कापून माजी आमदार मोहन मते यांना उमेदवारी मिळाल्याने संतप्त कोहळे यांनी अप्रत्यक्षपणे थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ‘मित्र जिंकला, कार्यकर्ता हरला’ असा नारा व्हायरल झाला आहे. मध्य नागपुरात यावेळी पुन्हा विकास कुंभारे ह्या विणकर समाजाच्या आमदाराला रिपीट केल्याने नाराजी आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा कामठी मतदारसंघ बदलून त्यांना काटोलमध्ये पाठवण्याचे सुरु असल्याचे कळल्याने बावनकुळे अस्वस्थ आहेत. त्यांचा मतदारसंघ बदलला तर काटोलमध्ये या अनिल देशमुख ह्या राष्ट्रवादीच्या हेवीवेट नेत्याशी त्यांना झुंजावे लागणार आहे.

पाच वेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे गोंदियाचे गोपाल अग्रवाल यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केल्याचे कळताच भाजप नेते विनोद अग्रवाल यांनी बंड पुकारले. मागची निवडणूक विनोद अग्रवाल यांनी भाजपच्या तिकिटावर लढवली होती. विनोद यांच्या बंडामुळे गोपाल अग्रवाल अडचणीत आले आहेत. हेच चित्र अनेक जागी दिसत आहे. त्यामुळे भाजपचं नव्हे तर शिवसेनेला आपली यादी काही जागी बदलावी लागेल अशी चर्चा रंगली आहे. पण ‘तिकीट मिळाले नाही म्हणजे अन्याय झाला हेच मानायला आपण तयार नाही’ असे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार मीडियाला सांगत आहेत.

नाराजीचा सूर एवढ्या मोठ्या प्रमाणावर येईल अशी अपेक्षा श्रेष्ठींनी केली नसावी. पण असंतुष्टांचा पवित्रा पाहून दुपारी येणारी दुसरी यादी लांबली आहे. उमेदवारी अर्ज भरायला आता फक्त दोन दिवस उरले आहेत. नाराजीचा तडाखा शिवसेनेलाही बसला आहे. नाराज लोकांचे श्रेष्ठी कसे समाधान करतात त्याकडे सर्वांचे लक्ष आहे. पहिल्या यादीत सुटलेले विनोद तावडे चंद्रकांत दादांना सकाळी भेटतात यावरून इच्छुकांच्या मनातली धाकधूक लक्षात येते.