ममताविरुद्ध बंडखोरी? चार कॅबिनेट मंत्री बैठकीला गैरहजर

Mamata Banerjee

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)यांच्याविरुद्ध मंत्रिमंडळात नाराजीचे संकेत आहेत. बुधवारी बोलावण्यात आलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत शुभेंदु अधिकारी, राजीव बॅनर्जी, गौतम देव आणि रवींद्रनाथ घोष हे चार मंत्री गैरहजर राहिलेत. गौतम देव हे कोरोना पॉझेटिव्ह असल्याने गैरहजर होते तर रवींद्रनाथ घोष आजारी होते, असे सांगण्यात येते.

दोन मंत्री नाराज

गैरहजर असलेले इतर दोन मंत्री शुभेंदु अधिकारी आणि राजीव बॅनर्जी यांच्यातील शुभेंदु अधिकारी हे नाराज आहेत, अशी चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू आहे. राजीव बॅनर्जी हे शुभेंदु यांचे निकटवर्तीय आहेत. या दोघांनीही बैठकीला गैरहजर राहण्याचे कारण दिले नाही. शुभेंदु बंडखोरी करू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, पुढच्या वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या संदर्भात सभा – बैठका घेणे, मिरवणुका काढणे सुरू झाले आहे. पण, शुभेंदु कुठेही तृणमूलच्या झेंडा लावत नाहीत किवा ममता बॅनर्जी यांचे नाव घेत नाहीत. नंदीग्राम येथील एका सभेत तर त्यांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या!

अभिषेक बनर्जी आणि प्रशांत किशोर नाराजी मिटवण्याचा मोहिमेवर

ममता बॅनर्जी यांचा पुतण्या खासदार अभिषेक बॅनर्जी आणि निवडणूक व्यूव्हरचनाकार प्रशांत किशोर यांनी गेल्या काही दिवसात नाराज मंत्री राजीव बॅनर्जी आणि लक्ष्मी रतन शुक्ला यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

या पार्श्वभूमीवर राजीव बॅनर्जी कॅबिनेच्या बैठकीत गैरहजर राहिल्याने त्यांच्या नाराजीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. तृणमूलमधील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा आहे. बऱ्याच ठिकाणी पक्षात गटबाजी असल्याचेही लक्षात येते आहे.

दुर्गापूर येथे तृणमूलच्या दोन गटात चकमक

दुर्गापूर येथे काळ रात्री तृणमूलच्या कार्यकर्त्यांच्या दोन गटात चकमक झाली, अशी माहिती तृणमूलचे बिशुन देव नोनिया यांनी दिली. यात गोळी लागून एक कार्यकर्ता ठार झाला आणि दोन जखमी झालेत, असे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER