विद्रोही आंबेडकरी कार्यकर्ते वीरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन

Vira Sathidar - Maharastra Today

नागपूर : अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘कोर्ट’ चित्रपटाचे प्रमुख अभिनेता आणि विद्रोही आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून विख्यात वीरा साथीदार यांचे आज कोरोनाशी झुंज देताना निधन झाले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’ सिनेमातील त्यांची भूमिका गाजली होती. एम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी मध्यरात्री वीरा साथीदार यांची प्राणज्योत मालवली. आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली. तर गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मूळ वर्धा जिल्ह्यातील असलेले वीरा साथीदार हे नागपूरच्या जोगीनगर झोपडपट्टीत लहानाचे मोठे झाले. घरी अठराविश्वे गरिबी असतानाही आईने त्यांना शिकण्याचं बळ दिलं. त्यांचे वडील नागपूरच्या रेल्वेस्थानकावर हमाली, तर आई बांधकाम मजूर म्हणून काम करत असे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वीरा साथीदार यांच्यावर पगडा होता. ते स्वत: गीतकार, पत्रकार होते. नागपूरला कामासाठी आलेल्या वीरा यांचे नाते आंबेडकरी चळवळीशी जुळले. शेकडो आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. बंडखोर कार्यकर्ता म्हणून त्यांचे व्यक्तित्व होते. चैतन्य ताम्हाणे यांच्या ‘कोर्ट’ या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत पोहचला होता. यानंतरही चळवळीशी संबंधित चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली आहे. ‘विद्रोही’ नावाच्या मासिकाचे संपादन केले. ‘रिपब्लिकन पँथर’ संघटनेच्या माध्यमातून ते वंचितांसाठी काम करत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button