कहीं पे निगाहें कहीं पे निशाना……

sonia-gadkari-modi

केन्द्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी सध्या खूप चर्चेत आहेत. ही चर्चा दोन कारणांनी गाजते आहे. एक म्हणजे त्यांनी स्वतः केलेली विधाने आणि दुसरे म्हणजे त्यांच्या कामाबाबत सोनिया व राहुल गांधी यांनी केलेली प्रशंसा. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेत्या असलेल्या सोनिया गांधी आणि काँग्रेसाध्यक्ष असलेले राहुल गांधी यांनी केलेले गडकरी कौतुक सहेतूक आहे हे सांगायला राजकीय पांडित्याची गरज नाही. परंतु गडकरी यांनी गेल्या दोन महिन्यांत केलेल्या विधानांचा रोख कोणाकडे होता याची संगती मात्र त्यांनी केलेल्या खुलाशा नंतरही लागलेली नाही.

ही बातमी पण वाचा : जो जात काढेल त्याला मी ठोकून काढेन : नितीन गडकरी

आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या नेत्यांना जनता झोडपून काढते, असे वादग्रस्त विधान नितीन गडकरी यांनी या वर्षाच्या प्रारंभी केले होते. ते कोणाबाबत केले होते हे अद्यापि स्पष्ट झालेले नाही. कदाचित पुढे होईलही. गडकरींचा अघळपघळ स्वभाव बघता त्यांची जीभ अनेकदा सैल सुटते हे सर्वज्ञात आहे. मात्र राजकीय वातावरण तापलेले असल्याच्या काळात अशी विधाने करण्याने नवे वाद निर्माण होतात याचा अनेकांना विसर पडतो. त्याला गडकरी हेही अपवाद नाहीत.

कधीकधी अशी विधाने पक्षांतर्गत विरोधकांना अनुलक्षून सुद्धा केलेली असतात हे विसरता येत नाही. त्यामुळेच त्यांच्या विधानाचा रोख पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याकडेच होता,’ असा दावा काँग्रेसने लगेच केला. गडकरी यांच्या नथीतून मोदींवर तीर मारण्याचा हा प्रयत्न होता.

परंतु मोदी यांनी त्याची दखलच न घेतल्यामुळे वाद रंगलाच नाही. न रंगलेल्या वादाचा धुरळा खाली बसून काही दिवस होत नाही तोच गडकरी यांनी आणखी एका वादाला जन्म दिला. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमधील भाजप पराभवाची त्याला पार्श्वभूमी होती. पराभवाची जबाबदारी नेतृत्वाने घ्यायची असते असे नितीन गडकरी एका कार्यक्रमात बोलून गेले. त्यांच्या विधानात तथ्य नव्हते असे नाही. त्यामुळे गडकरी यांचे हे उद्गार भाजपाध्याक्ष अमित शहा यांना उद्देशाने आहेत अशी टिप्पणीवजा टीका करण्याची संधी काँग्रेसने साधली. गडकरी यांनीच पक्षविरोधकांच्या हाती कोलीत दिल्यावर काँग्रेसला दोष देण्यात हंशील नव्हते. भाजपच्या सुदैवाने यासंबंधीचा वादही अल्पायुषी ठरला.

पण मोदी यांना डिवचण्यासाठी नितीन गडकरी हे बोलघेवडे व्यक्तिमत्व उपयोगी पडणारे आहे हे काँग्रेसी नेत्यांना कळून चुकले आहे. त्यामुळेच काँग्रेस नेते गडकरी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोदी व शहा यांच्यावर शरसंधान करीत असतात. नोटबंदी, जीएसटीवरून पंतप्रधानांवर टीका करताना प्रारंभी राहुल गांधींनी आणि नंतर सोनिया गांधी यांनीही हाच कित्ता गिरवला. नितीन गडकरीं यांच्या मध्येच काही तरी करून दाखवण्याची धमक आहे, असा स्तुतीवर्षाव करून त्यांनी भारतीय जनता पक्षात बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न केला.

गडकरी यांनी आता शेतकऱ्यांच्या व्यथा, नष्ट होत चाललेल्या संस्था आणि राफेल घोटाळ्यावर बोलण्याची गरज आहे,’ असे ट्विट करत राहुल यांनी गडकरींची प्रशंसा केली होती. ते लक्षात आल्यावर गडकरी यांनी, माझ्यातील हिंमतीला राहुल गांधींच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे सांगून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण चर्चा थांबली नाही. उलट सोनिया गांधी यांनी परवा लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात गडकरी यांच्या कार्याची स्तुती करून पुन्हा भाजपात कलागती लावण्याला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन दिले. त्यांचे गडकरी कौतुक पाहून काँग्रेसच्या अन्य सदस्यांनीही गडकरींसाठी बाके वाजवली. एरवी सरकारच्या कोठल्याही यशाचे कौतुक तर सोडा साधी दखलही न घेणा-या काँग्रेसी नेत्यांनी एका मंत्र्याच्या कामाचे बाके बडवून स्वागत करावे हे संसदेतील चित्र तसे विरळाच.

राष्ट्रपतींच्या शेवटच्या अभिभाषणाच्या वेळीसुद्धा मोदी, अमित शहा यांची दखल घेण्याचे टाळणारे राहुल व सोनिया गांधी गडकरी यांचे जाहीर कौतुक करतात यामागील मेख कळण्याइतकी जनता आता दुधखुळी राहिलेली नाही.

चंद्रशेखर जोशी