संजय दत्तला अभिनेता म्हणून प्रगल्भ करणारा वास्तव

Vaastav

एंट्रो – मुंबईतील गिरणी कामगारांचा संप झाल्याने अनेक गिरणी कामगार देशोधडीला लागले. त्यांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहिले. घराच्या आर्थिक विवंचनेला हातभार लागावा म्हणून अनेक मुले गुन्हेगारीच्या वाटेवर गेली. यातूनच अनेक गुंड तयार झाले. या पार्श्वभूमीवरच महेश मांजरेकरने संजय दत्तला घेऊन वास्तव तयार केला. अक्षरशः वास्तववादी असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ तर घातलाच संजय दत्तच्या लोकप्रियतेतही प्रचंड वाढ झाली. गँगस्टरच्या जीवनावर आधारित हा एक उत्कृष्ट चित्रपट मानला जातो.

१९९९ ची गोष्ट. वर्सोवा इथे वास्तव चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. संजय दत्त, संजय नार्वेकर यांच्यावर एका महत्वाच्या दृश्याचं शूटिंग केले जाणार होते. महेशने आम्ही काही पत्रकारांना शूटिंग पाहाण्यासाठी आमंत्रित केले होते. रात्रीची वेळ होती. चित्रपटातील पावभाजीच्या गाडीवरील हाणामारीचे चित्रपटाला कलाटणी देणारे अत्यंत महत्वाचे दृश्य चित्रित केले जात होते. हे शूटिंग पाहाताना महेशने हे दृश्य रस्त्यावरच का चित्रित केले असे विचारता त्याने सांगितले होते, या दृृश्यासाठी मला जो फील हवा आहे तो स्टुडियोत मिळाला नसता. त्यामुळेच मी येथे रस्त्यावर त्याचे शूटिंग करीत आहे. पडद्यावर हे दृश्य पाहाताना चांगलेच अंगावर आले होते.

Sanjay Duttखरे तर महेश मांजरेकरचा वास्तवच्या निमित्ताने प्रथमच हिंदीत लेखक-दिग्दर्शक म्हणून प्रवेश होत होता. मी जेव्हा कथा लिहून पूर्ण केली तेव्हा माझ्या डोळ्यासमोर संजय दत्तच आला असे महेशने एकदा बोलताना सांगितले होते. जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय दत्तलाही एका हिट चित्रपटाची नितांत आवश्यकता होती. यानंतर चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत अनेकदा संजय दत्त आणि महेश मांजरेकरशी गप्पा झाल्या. संजय दत्तने तर रघूच्या भूमिकेत अक्षरशः स्वतःला झोकून दिले होते. या दोघांना वास्तवने झपाटून टाकले होते. दोघांनाही चित्रपट सुपरहिट होईल याची पूर्ण खात्री होती. जेव्हा वास्तव प्रदर्शित झाला तेव्हा या दोघांचाही विश्वास किती खरा होता ते जाणवले. चित्रपट चालला नसता तर महेशला पुन्हा अभिनयाकडे वळावे लागले असते. परंतु नियतीने दोघांनाही यश देण्याचा निर्णय घेतला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम तर केलेच. कारकिर्दीतील मैलाचा दगड मानला जाईल असा चित्रपटही वास्तवच्या निमित्ताने संजय दत्तला मिळाला. त्याला अभिनयासाठी पुरस्कारही मिळाला.

ही बातमी पण वाचा : या बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनेत्यांनी कुख्यात गुंडाची भूमिका साकारली

रघू (संजय दत्त) हा नामदेव (शिवाजी साटम) आणि शांता (रीमा लागू) यांचा मोठा मुलगा. अशिक्षित आणि वाईट मार्गाकडे लक्ष असलेला. तर दुसरा मुलगा विजय (मोहनीश बहल) सरळमार्गी स्वभावाचा. थोडेफार शिकून कुठे तरी नोकरी मिळवावी आणि घर चालवण्यास हातभार लावावा असा विचार असणारा. रघू मुलांबरोबर टवाळक्या करताना गुंडगिरीच्या जाळ्यात ओढला जातो. शहरातील कुख्यात गुंड बनतो. खूप पैसेही कमवतो. परंतु त्याच्या आईला त्याचा हा हरामाच्या कमाईचा पैसा नको असतो. आई पैसे स्वीकारत नाही म्हणून रघू नशा करू लागतो आणि दिवसेंदिवस त्याचा ग्राफ घसरू लागतो. दुस-या टोळीचे गुंड, पोलीस त्याच्या मागावर असतात. चित्रपटाचा क्लायमॅक्स खूपच चांगला असल्यानेच या चित्रपटाला चार चांद लागले. मदर इंडियामध्ये ज्याप्रमाणे नर्गिस खोडकर सुनिल दत्तला गोळ्या घालून मारते अगदी तशाच प्रकारचा क्लायमॅक्स महेश मांजरेकरने चित्रित केला. चित्रपटाच्या शेवटी रघू आईच्या हातात बंदूक देऊन गोळ्या घाल असे सांगतो. आणि मुलाला शांती मिळावी म्हणून आई त्याला गोळ्या घालते. हा क्लायमॅक्सही प्रेक्षकांना खूप आवडला होता. नम्रता शिरोडकर, परेश रावल, आशिष विद्यार्थी यांनी आपापल्या भूमिका खूपच चोखपणे बजावल्या. चित्रपटातील ये देखरेली हे क्या, असली है असली, पचास तोला, पचास तोला हा संवाद तर प्रत्येकाच्या ओठावर होता.

संजय दत्तनेही नंतर अशा प्रकारच्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला यश आले नाही. तीन वर्षानंतर चित्रपटाचा पुढचा भाग हत्यार नावाने महेश मांजरेकरने रुपेरी पडद्यावर आणला होता. परंतु त्याला वास्तवप्रमाणे तर सोडा त्याच्या दहा टक्केही यश मिळाले नव्हते. यानंतर अनेक चित्रपटांमध्ये गँगस्टरचे जीवन जितके चांगले दिसते तितके नसून तेथे मृत्यूशिवाय दुसरा मार्ग नाही असे दाखवण्यात आले. परंतु वास्तव हा वास्तव होता. आणि यासाठी महेश आणि संजयला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER