चिदंबरमवरील कारवाईचा संबंध ; अमित शहा म्हणाले होते, ‘मैं समंदर हूं, लौटकर जरूर आऊंगा’

Chidambaram-Amit Shah

नवी दिल्ली :- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेचा संबंध केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीदेखील जोडला जात आहे. काँग्रेसची सत्ता असताना सीबीआयने अमित शहा यांना अटक केली होती. तेव्हा अमित शहा यांना तुरुंगात जावे लागले होते. इतकेच नव्हे तर गुजरातमध्ये जाण्यावरदेखील बंदी घालण्यात आली होती. आता मात्र या घटनाक्रमावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तब्बल २ वर्षे गुजरातबाहेर राहिल्यानंतर २०१२ च्या विधानसभा निवडणुकीआधी ते राज्यात परतले. गुजरातमध्ये परतल्यानंतर एका मीटिंगमध्ये ते सहभागी झाले होते. या मीटिंगमध्ये त्यांनी एक शेर वाचला होता. अमित शहा म्हणाले…

ही बातमी पण वाचा : पाकिस्तानची काळ्या यादीत रवानगी

मेरा पानी उतरता देख
किनारे पर घर मत बना लेना
मैं समंदर हूं
लौटकर जरूर आऊंगा

अमित शहा यांनी म्हटलेला तो शेर आजच्या परिस्थितीशी जोडला जात आहे. तेव्हा चिदंबरम देशाचे गृहमंत्री होते आणि अमित शहा सीबीआयच्या जाळ्यात तर आज शहा हे गृहमंत्री आहेत आणि चिदंबरम सीबीआयच्या जाळ्यात आहेत. नऊ वर्षांत या परिस्थितीने यू-टर्न घेतला आहे. नऊ वर्षांपूर्वी भाजपने अमित शहा यांच्यावरील कारवाई राजकीय हेतूने असल्याचा आरोप केला होता. तसाच आरोप आज काँग्रेसचे नेते करत आहेत. विशेष म्हणजे अमित शहा यांच्याप्रमाणेच चिदंबरम यांनीदेखील पत्रकार परिषद घेतली होती आणि स्वत:ला निर्दोष असल्याचे म्हटले होते.

ही बातमी पण वाचा : चिदंबरम यांना अटक, पुढचा नंबर कुणाचा?

सीबीआय अथवा ईडीचा वापर करून केल्या जाणा-या खेळात एकेकाळी काँग्रेसने भाजपच्या दिग्गज नेत्यांना मात दिली होती. आज त्याच खेळात काँग्रेसचे नेते अडकले आहेत. सात  वर्षांत संपूर्ण खेळच बदलला आहे. या पार्श्वभूमीवर सध्या अमित शहा यांचा शेर सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. हा शेर त्यांनी २०१२ मध्ये जेव्हा बंदीनंतर प्रथमच गुजरातमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हटला होता.

देशात जेव्हा काँग्रेसची अर्थात यूपीए-२ ची सत्ता होती. हा काळ नऊ  वर्षांपूर्वीचा आहे. पी. चिदंबरम तेव्हा देशाचे गृहमंत्री होते. २००८ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर शिवराज पाटील यांना गृहमंत्रिपदावरून हटवून चिदंबरम यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. तेव्हाच सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरण चर्चेत होते. या प्रकरणात सीबीआयने तेव्हा अमित शहा यांना आरोपी केले होते. २५ जुलै २०१० रोजी सीबीआयने त्यांना अटकदेखील केली होती. या अटकेच्या आधी अमित शहा यांनी भाजपच्या कार्यालयात पत्रपरिषद घेतली होती.

यावेळी त्यांनी सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगतानाच राजकीय हेतूने करण्यात आलेला हा आरोप न्यायालयात टिकणार नाही, असेही ते म्हणाले होते. सीबीआयने त्यांना अटक करण्याआधी अमित शहा चार दिवस बेपत्ता होते. या प्रकरणी त्यांना तीन  महिने तुरुंगात राहावे  लागले होते. २९ ऑक्टोबर २०१० रोजी त्यांना जामीन मिळाला आणि त्यानंतर गुजरात जाण्यावर बंदी घालण्यात आली.