रिअल इस्टेट विकासकांची लंडनला धाव

- जमीन खरेदीत ११ टक्के वाढ

Real Estate Developers

मुंबई : देशांतर्गत रिअल इस्टेट बाजारात सध्या मंदीचे मळभ आहेत. यामुळे येथील विकासकांनी परदेशातील जागांना जवळ केल्याचे चित्र आहे. गुंतवणूकदारांनी लंडनमध्ये यापूर्वीच्या तुलनेत कैकपटीने अधिक जमीन खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे.

रिअल इस्टेट क्षेत्रातील फर्म ‘नाइट फ्रँक’च्या ‘लंडन सुपर प्राइम सेल्स इनसाइट विंटर २०१९’ या अहवालानुसार गेल्या १२ महिन्यांमध्ये (जून २०१९पर्यंत) वार्षिक आधारावर भारतीय धनिकांकडून लंडनच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये जमिनी खरेदी करण्यामध्ये ११ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. अहवालात नमूद केल्यानुसार लंडनमधील मेफेअर, बेलग्राव्हिया, हाइड पार्क, मॅरिलिबोन आणि सेंट जॉन्स वूड अशा मोजक्याच ठिकाणी भारतीयांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती खरेदी केली आहे.

भारतीयांकडून लंडनमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनींची खरेदी करण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये लंडनमधील प्रॉपर्टीच्या दरांत मोठ्या प्रमाणात घट झाल्यानंतर भारतीय खरेदीदारांचा ओढा वाढला आहे. ‘नाइट फ्रँक’च्या अहवालानुसार युरोपीयन युनियनमधून बाहेर पडण्याच्या ब्रिटनच्या निर्णयामुळे आणि अन्य काही स्थानिक कारणांमुळे ऑक्टोबर २०१९मध्ये लंडनमध्ये मोक्याच्या जागी असणाऱ्या प्रॉपर्टीच्या किमतीत २० टक्के घट नोंदविण्यात आली. या शिवाय पौंड या तेथील चलनाचे झालेले अवमूल्यन आणि किमतींमुळे भारतीय खरेदीदारांनी सवलतीच्या दरात मोठ्या जमिनी खरेदी केल्या आहेत.

‘नाइट फ्रँक’च्या अहवालानुसार, लंडनमध्ये प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्यांमध्ये मोठे प्रमाण तरुण ग्राहकांचे आहे. ‘लंडनमध्ये सुपर प्राइम बायर्सच्या सरासरी वयात घट होत आहे. सप्टेंबर २०१९पर्यंत जवळपास ७३ टक्के सुपर प्राइम बायर्सचे वय ५०पेक्षा कमी आहे; हेच प्रमाण २०१५च्या सुरुवातीला निम्म्याच्या निम्मे होते.

रिझर्व्ह बँकेच्या ‘लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम’च्या (एलआरएस)अंतर्गत भारतीय नागरिकांना प्रत्येक आर्थिक वर्षात २.५० लाख अर्थात १.७५ कोटी रुपये विदेशात पाठविण्याची मुभा मिळते. मात्र, एकाच कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन विदेशात प्रॉपर्टी खरेदी करीत असतील, तर त्यांना त्या पटीत रक्कम विदेशात पाठवता येतात.