आरक्षणासाठी बलिदान देण्यासही तयार : नितीशकुमार

Nitish Kumar

गया (बिहार) :- अनुसुचित जाती-जमातींचे आरक्षण संपवण्याची कोणामध्येही ताकद नाही, असे विधान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले आहे. बिहारमधील गया येथे मगध प्रमंडलीय दलित-महादलित कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नितीशकुमार बोलत होते.

यावेळी नितीशकुमार म्हणाले, न्याय आणि विकासाप्रती आमची वचनबद्धता आहे. त्याचमुळे आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत. न्यायासहित विकास म्हणजे समाजातील प्रत्येक भागाचा विकास होय. आपल्या देशात एससी-एसटीचे आरक्षण संपवण्याची ताकद कोणातही नाही. आरक्षणासाठी आम्ही बलिदान देण्यासही तयार आहोत.

पुढे ते म्हणाले, काही लोक जनतेसाठी काहीही न कुठलाही निश्चित विचार न घेता राजकारणात प्रवेश करतात. मात्र, राजकारणात ताकद मिळाल्यानंतर ते आपल्या पदाचा दुरुपयोग करतात. काही लोक तर समाजात नेहमीच भ्रम आणि अडथळे निर्माण करण्याचे काम करीत असतात, असेही यावेळी ते म्हणाले.

नितीशकुमार पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली. या संविधानाला सभेनेदेखील स्विकारले. जर आरक्षण मिळालं नाही तर गरीब लोकांचे विकास कसे होणार ? जोवर मागासवर्गीय जनतेचा विकास होत नाही तोवर समाज, राज्य आणि देशाचा विकास होऊ शकत नाही.