रत्नागिरी जिल्ह्यात भरारी पथकाद्वारे ठेवणार काळ्याबाजारावर वचक

रत्नागिरी/प्रतिनिधी :-  साठेबाजी व जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून या पथकाद्वारे काळ्याबाजारावर वचक ठेवण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या लॉकडाऊनमुळे केवळ अत्यावश्यक सेवा-सुविधा पुरविणाऱ्या आस्थापना चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अन्न-ध्यान्य, भाजीपाला, फळे, मटण, मासे, अंडी, औषधे, दूध इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा विविध दुकानदारांकडून, विक्रेत्यांकडून जास्तीत साठा केला जात आहे. यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण केली जाण्याची शक्यता आहे. अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांनी भरारी पथक कार्यरत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नायब तहसीलदार किंवा पुरवठा निरीक्षण अधिकारी किंवा पुरवठा निरीक्षक, पोलिस कॉन्स्टेबल किंवा पोलिस मित्र यांचा समावेश पथकात असणार आहे. नगर परिषद किंवा नगर पंचायत (हद्दीत) मधील मालमत्ता विभागातील कर्मचारी तसेच ग्रामसेवक (ग्रामपंचायत हद्दीत) यांचा समावेश करण्यात आला आहे. या भरारी पथकाने अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या आस्थापनांची तपासणी करण्यासाठी गोपनियता बाळगून आपली ओळख पटू न देता ग्राहक म्हणून अचानक भेट देऊन तेथील परिस्थिती लक्षात घेऊन त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे द्यावा, अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.