उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदी भेटीवर नेत्यांच्या प्रतिक्रिया

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनतंर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगायला लागल्या आहेत. काँग्रेस नेत्यांनी या भेटीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून भाजप नेत्यांनी मुख्यंत्र्यांची पाठ थोपटली आहे. दोन्ही भाऊ भांडून जरी वेगवेगळे राहत असले तरी नाते काही संपत नाही, उद्धव ठाकरे हे आता स्वतः निर्णय घेण्याचे धाडस करत असल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. पंतप्रधान यांची भेट घेण्यात काहीच गैर नाही. पण सत्ता टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांबरोबरच सोनियांचीही भेट घेतली, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.

तीनही पक्षांतील महत्त्वाकांक्षी लोकांमुळेच सरकार कोसळेल : रावसाहेब दानवे

तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, मतभिन्नता भावा भावांमध्ये सुद्धा असते. शेवटी ते दूर करतात आणि एकत्र येतात, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. शिवसेनेने सीएएला पाठिंबा दिला असला तरी सरकारवर त्याचा काही परिणाम होणार नाही असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केल आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींबरोबर सव्वा तास, सोनियांबरोबर चाळीस ते पन्नास मिनिटे, अमित शाह यांच्याबरोबर अर्धा तास तर लालकृष्ण अडवाणी यांच्याबरोबर काही मिनिटे उद्धव ठाकरेंची चर्चा झाली.

राज्यात सीएए आणि एनपीआर लागू करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या भेटीत महाराष्ट्रासाठीचा निधी, जीएसटीची थकीत रक्कम, पंतप्रधान पीक विमा योजना यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. केंद्रात आणि राज्यात मतभेद नसल्याचंही ते म्हणाले. महाराष्ट्र हितासाठीच्या निर्णयांसाठी केंद्र मदत करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.