
कोल्हापूर : रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात बळीराजाच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालून आंदाेलन केले. यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांना निवेदन दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात संघटनेचे कार्यकर्ते दुपारी बारा वाजता घोषणा देत आले. मुख्य प्रवेशद्वाराजवळच कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले. बळीराजाच्या प्रतिमेला अभिषेक करुन कृषी कायद्यांचे समर्थन जाहीर केले. प्रा एन. डी. चौगुले . रुपाली पाटील, सूरज पोळ, सर्जेराव पाटील, संदीप माळी आदी उपस्थित होते.
नव्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांची दलालांच्या विळख्यातून मुक्तता होणार आहे. कोणत्याही शेतकऱ्यांवर कंत्राटी पद्धतीची शेती केंद्र सरकारने लादली नाही. शेतकरी फक्त पिकाचा करार कंपन्यांसोबत करणार आहेत, जमिनीचा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची जमीन कूळ कायद्यात अडकेल ही विरोधकांकडून घातली जाणारी भीतीही निराधार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लुबाडणूकच झाली आहे. कृषी कायदे शेतकऱ्यांचे फायद्याचे आहेत असे निवेदनात म्हटले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला