“कच्चा लिंबू !”

कच्चा लिंबू

आम्ही शाळेत असताना खेळांमध्ये मोठ्या बहीण-भावांच्या मधे मधे कोणी छोटी भावंडं लुडबुड करत असली, की त्याला कच्चा लिंबू म्हणत असत. म्हणजे राखीव गडी म्हणा ना ! त्याला खेळात स्थान असून नसल्यासारखे होते. किंवा शाळेतच परीक्षेमध्ये रिकाम्या जागा भरा हा प्रश्न असतो. आजुबाजुचा संदर्भ माहित असेल म्हणजे थोडाफार अभ्यास झाला असेल तर तो प्रश्न जमूनही जातो. नाही तर अंदाजे टोला असेल तर चुकण्याची शक्यता जास्त ! पण प्रत्यक्ष व्यवहारात सुद्धा असे कच्चा लिंबू आपल्याला भरपूर दिसत असतात. त्यांना प्रत्यक्ष आयुष्यात महत्त्व अगदी रिकाम्या जागा भरण्या इतपतच !

पूर्वीच्या काळी मोठ्या एकत्र कुटुंबामधून एखाद -दोन व्यक्ती अशा असायच्याच . कच्चा लिंबू ज्यांना फारसं काही स्थान नसायचं, गृहीत धरलं जायचं. गरज असेल तेव्हा हाताशी धरलं जायचं, रिकामी जागा भरण्यासाठी म्हणून ! शाळांमध्ये वर्गा वर्गातून असा एखादा कच्चालिंबु असतोच.

अशाच चाळीस पंचेचाळीस पन्नासच्या एक प्रौढ बाई माझ्या समोर होत्या. सांगत होत्या,” मॅडम बघा सगळे माझ्याकडून हवं तेव्हा काम करून घेतात आणि नंतर मात्र पूर्णपणे वगळून टाकतात. मग मी त्यांच्या खिजगणतीतही नसते.” हे सांगताना त्यांचे वारंवार डोळे भरून येत होते. यजमान त्यांच्या व्यवसायामध्ये बिझी आणि मुले त्यांच्या त्यांच्या उद्योगात ! रजोनिवृत्तीचा काळ असल्यामुळे त्यांना हे वगळण जास्तच जाणवत होतं.

एक सुशिक्षित बाई मध्यंतरी मला भेटल्या. आता निवृत्त झालेल्या. पूर्वी प्रोफेसर होत्या. नवरा आणि तरुण मुलगा अकालीच गेला. त्यानंतर त्यांनी सुन आणि नातू यांचा सांभाळ केला. आता सगळं स्थिरस्थावर झालं .परंतु आता सुन विचारत नाही .तुम्ही सांभाळलं नसतं तरी आम्ही राहिलो असतो व्यवस्थित असं म्हणून दुखावते. त्यामुळे त्यांनी भरलेल्या रिकाम्या जागेची किंमत, आज “कच्चा लिंबा “सारखी झालेली आहे.

परवा विनू फुरंगटून बसलेली दिसली. का ग तू खेळायला का नाही जात आज ? तुझी दररोजची मैत्रीण तर खेळते आहे. त्यावर विनू म्हणाली ,आज त्या वाटाणा ,फुटाणा, शेंगदाणा आल्या आहेत ना तिच्याकडे ! मग ती त्यांच्याकडे निघून गेली मला सोडून ! आणि मग त्या सगळ्याजणी मिळून मारतात मला. मी नाही जात मग ! मुलांमध्येही असं ग्रुप करणं, एकट पाडणे हे चालू असतंच ! आणि मग एक कोणीतरी “कच्चा लिंबू “बनून कुढत राहतं.

सरिता स्वभावाने अगदी शांत,सरळ. छक्केपंजे डाव पेच न जमणारी. त्यामुळे जेव्हा ग्रुपमधल्या टिंगलटवाळी सुरू होतात, त्या वेळी ती नुसती असते .तिच्याशी कुणी काही विशेष बोलत नाही. ग्रुपमध्ये ती कच्चा लिंबू असते. एकेकटी मैत्रीण असली की मग त्यांच्या गप्पा होतात.. इतर वेळी तिची जागा रिकामी जागा भरल्यासारखी… अगदी “कच्चा लिंबू !”

अनेकदा बरेच जण जोडीदाराला रिकाम्या जागा भरल्याप्रमाणे वापरतात. वामनरावांच्या पत्त्याचा ग्रुप आहे. ज्येष्ठ नागरीक संघातहीते जातात आणि मराठी मंडळाचेही काम पाहतात. पण मग जेव्हा यापैकी काही नसेल त्यावेळी आता रिकामा वेळ कसा घालवायचा ? हे न कळल्याने ते शारदा काकूंना म्हणतात, “चला आज जाऊ जरा रपेट मारायला ! “त्याही बिचाऱ्या गजरा बिजरा लावून उत्साहाने जायची तयारी करतात. त्यांना माहीत नसेल का ? आज त्या एक कच्चा लिंबू बनून रिकामी जागा भरणार आहेत? बऱ्याच कुटुंबातून असं चित्र दिसतं बघा ! जेवण झाल्यावर सगळ्यांनी एकत्र बसून काही वेळ घालवावा अशी पद्धत पडलेली असते. पण अशावेळी तरुण मुले किंवा इतर सदस्य प्रत्येक जण आजकाल तोंडासमोर मोबाईल घेऊन बसलेले असतं ,आणि मग आपल्या इच्छेप्रमाणे मधूनच चर्चेत भाग घेतात .घरातील वडीलधारी त्यांच्यासाठी असे “कच्चा लिंबू” असतात की काय ? हे जर त्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या व्यक्तीने त्यांना वगळलं तर ते अस्वस्थ होतात, सैरभैर होतात.

खरंतर बरेचदा समोरची व्यक्ती महत्त्वाच्या विषयावर बोलत असते, काही निर्णय घ्यायचे असतात, त्यावर सगळ्यांची मते हवी असतात. अशावेळी या व्यक्तीला कच्चा लिंबू समजून बरीच जण फोन वरच बोलत राहतात.

काही नाती “टाईम किलर्स” म्हणून उपयोगात आणली जातात बघा ! नीता इतर वेळा खूप बिझी असते. पण तिचा नवरा गावाला गेल्यावर शेजारच्या काकूंची खूप वेळ गप्पा मारत बसते. कारण तिचा वेळ जात नसतो. बरेचदा सोशल मीडियावरची नाती ही पण तशीच ! आपल्याकडे जेव्हा वेळ असतो, तेव्हा आपला हवा तेवढा वेळ घालवण्यासाठी फेसबुक कसं मदत करतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. हा ! पण एक गोष्ट नक्की ,ती म्हणजे कधीकधी या फेसबुक फ्रेंड शी बोलत असताना आपलं घरातल्या लोकांकडेही दुर्लक्ष होतं.

खूप जणांबाबत तसं घडतं ,शेजारी राहणारे पूर्वीचे लोक , लग्न होईपर्यंतच्या मित्र मैत्रिणी, मग कामाच्या ठिकाणचे कलिग, मुलांच्या शाळेमुळे झालेल्या ओळखी किंवा इतरही बरीच जुनी जोडलेली नाती ही घरांमध्ये वडील मंडळी आहेत तोपर्यंत जपली जातात. नंतर हळूहळू ती नाती दूर जातात. यापैकी काही केवळ ,आयुष्यात त्या त्या वेळी आवश्यक होती म्हणून भरलेल्या रिकाम्या जागा सारखीच ! आयुष्यातील त्यांची किंमत केवळ ” कच्चा लिंबू “म्हणूनच !

अशीच एक रिकामी जागा गरजेनुसार ,गृहिणी नेहमीच भरत असते. अंगण झाडणारे आजोबा आले नाहीत, धुणी-भांडी वाली मावशी आली नाही, झाडू पोछा वाली बाई नाही ,पोळ्यावाली बेबी नाही, अशी ही लपाछपी आलटून-पालटून काम करणाऱ्यांची चालूच असते. अशावेळी त्या त्या रिकाम्या जागा भरायला गृहिणी नेहमी तत्पर असते. अर्थात ते ती आवडीने करत असते, त्याला ती कर्तव्याचा भाग मानत असते .अशावेळी रिकामी जागा भरत असली तरी तिला कच्चा लिंबूपणं बहाल केलेलं नसतं एव्हढंच ! असते ती गृहित धरलेलीच.

फ्रेंड्स ! हे असं रिकाम्या जागी भरलं जाणं खूप दुःखदायक असतं. मग आपण कुणाला असा कच्चा लिंबू म्हणून समजतो का ? “कच्चा लिंबू “म्हणजे त्या व्यक्तीला अक्कल नाही ,व्यवहार ज्ञान नाही, बावळट आहे, काहीच समजत नाही , गरज असेल तेव्हा मदत घेऊन ,नको तेव्हा बाजूला टाकावं अशी सगळी विशेषणं प्राप्त व्यक्ती हे आत्तापर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. यासाठी हा विचार नक्की करायला हवा.

*ज्या व्यक्तींना तुमचा सहवास हवा वाटतो त्यासाठी पुरेसा वेळ ठरवून काढता का ?(अगदीच अपरिहार्य कारणास्तव त्यात बदल करावा लागेल)

*ज्या वेळी ज्या व्यक्तींबरोबर असाल तेथेच असायला हवं, आणि उगीचच इतरांशी तुलना न करता त्यांच्याबरोबर आदराने वागायला हवं

*महत्त्वाच्या व्यक्तींच्या अडीअडचणींना धावून जाणे पाठीशी उभे राहणे हे काडीने औषध न लावता प्रत्यक्ष कृतीने मदत करून दाखवावी.

*बरेचदा मला वेळ आहे म्हणून इतरांच्या वेळेबाबत न विचारता फोन करणे, भेटी ठरवणे या गोष्टी करायच्या नाहीत हेही महत्त्वाचं.

*सगळ्यात महत्त्वाचं ! मी माझा आदर करतो/ करते. त्यामुळे मी कधीही “कच्चा लिंबू “बनुन “रिकाम्या जागा” भरायला जाणार नाही .म्हणजेच तसं मला वागवण्याचा अधिकारच मी कुणाला देणार नाही, तो रिमोट मी माझ्या हातात ठेवीन हे ठरवणे.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER