रविंदर जडेजा, जिंकण्याची वृत्ती आणि करोना…

Ravindra Jadeja - Coronavirus - Maharashtra Today

Shailendra Paranjapeइंडियन प्रिमियर लीगच्या (IPL) रविवारच्या मुंबईत झालेल्या ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट सामन्यात महेन्द्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्जने विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चँलेंजर्स बंगलोरचा (RCB) ६९ धावांनी  धुव्वा उडवला आणि घराघरात चर्चा झाली ती आयपीएल इतिहासात एका षटकात सर्वाधिक ३७ धावा फटकावणाऱ्या रविंदर जडेजाची (Ravindra Jadeja). विसावे षटक सुरू होताना १५४ धावांवर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने (CSK) या ऐतिहासिक षटकात जडेजाने मारलेल्या पाच षटकारांच्या जोरावर १९१ धावांचे आव्हान बंगलोर संघासमोर उभे केले. जडेजाने नंतर चार षटकात तीन बळी टिपलेच आणि बंगलोरच्या एका फलंदाजाला चपळ क्षेत्ररक्षणाद्वारे धावचितही केले. सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू कसा असावा, याचे जणू प्रात्यक्षिकच रविंदर जडेजाने रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर घडवले. शेवटच्या क्षणापर्यंत जिंकण्याची वृत्ती, मिळेल त्या संधीचा सुयोग्य फायदा घेण्याचं कौशल्य, कसोटीच्या क्षणी सर्वोत्तम कामगिरी करण्याची किमया या गोष्टी तर चेन्नई सुपर किंग्ज संघाने केल्याच, पण गुणवत्तेला अनुभवाची जोड असल्याने त्यांनी बलाढ्य आणि गुणवत्तेनं कुठेही कमी नसलेल्या विराट कोहलीच्या संघाला सहजगत्या हरवलं.

वीस षटकांचा सामना क्रिकेट कौशल्याबरोबरच एक मानसिक लढाईदेखील आहे आणि कसोटीच्या क्षणी मनोबल कणखर ठेवण्यालाही त्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. क्रिकेट असो की जगण्याची लढाई, किस्मत हिम्मतवालोंका साथ देती है किंवा हिम्मत-ए-मर्दा, मदद-ऐ-खुदा थोडक्यात मनोबल टिकवल तर परमेश्वरही मदत करतो किंवा तुम्ही युद्ध जिंकता.

करोनानं (Corona) मृत्यूचं तांडव दाखवलेलं असताना त्याचा मुकाबला करतानाही जडेजाने दर्शन घडवलेल्या गुणांचं दर्शन आपल्या राज्याच्या नेतृत्वाकडून अपेक्षित आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढायची तयारी, तेही हिम्मत न हारता हे महत्त्वाचं आहे. त्याऐवजी आपली लढायची तयारी आहे पण करोनाची तयारी आहे का आपल्याशी लढायची, असले प्रश्न विचारले तर जडेजाच काय कोणताही अष्टपैलू सामने हरेल. क्रिकेटमधे किंवा कोणत्याही खेळात सरावाला महत्त्व आहे. तसेच तंदुरुस्तीला. त्यानंतर जडेजाने दर्शन घडवलेल्या गुणांचे आणि जिंकण्याच्या वृत्तीची सर्वाधिक गरज असते. आता मी काय करू, अशी हताशता दाखवणारे लोक जिंकलेले सामनेही हरण्यास कारणीभूत ठरू शकतात.

तीच गोष्ट करोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट येताना घडलीय. वास्तविक, करोनाच्या पहिल्या लाटेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतल्या उणिवा, त्रुटी, मर्यादा सपशेलपणे दाखवून दिल्या होत्या. तरीही जून जुलैनंतर सामान्य जनजीवन सुरू करताना सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, प्राणवायूचे प्लान्ट उभारणे, रेमडिसिव्हरचा काळा बाजार पहिल्या लाटेतही झाला होता हे लक्षात घेऊन उपाययोजना करणे, खासगी क्षेत्रातल्या सर्व डॉक्टर्स, तज्ज्ञांना करोना आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी सिद्ध करणे, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या टीम्स तयार करणे, त्यांना प्रशिक्षित करणे या पातळीवर फारसे काही केले गेले नाही.

आता साखर कारखान्यांनी प्राणवायू तयार करण्याचे प्लान्ट टाकण्याचा विचार पुढे आला आहे. प्राणवायू निर्मितीचा प्लान्ट एका रात्रीत टाकला जाऊ शकत नाही, हे तशी सूचना करणाऱ्यांनाही माहीत आहे. केंद्र सरकारच्या पातळीवरून खास प्राणवायूची ट्रेन ग्रीन कॉरिडॉरमधून देशभर फिरवली जातेय. साखर कारखान्यांनी प्राणवायूचे प्लान्ट टाकायला दिवाळी उजाडेल आणि तोपर्यंत करोनाचा विषाणू निर्जीव असल्याने तो थांबून राहणार नाही, असे आजचे चित्र आहे. त्याऐवजी महाआघाडी सरकारचे कर्ते धर्ते असलेल्या पवारसाहेबांनी गावागावात शिवसेना-कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस या तीनही पक्षांच्या एकत्र मदतीनं हेल्पलाइन, मदत कार्यालये सुरू करावीत आणि कोणालाही रेमडिसिव्हर, प्राणवायू हवा असला तर आम्ही देऊ, ही व्यवस्था करावी. त्याबरोबरच प्रत्येक वाढदिवसाला फ्लेक्सवर झळकणाऱ्यांना गोरगरीबांच्या दोन वेळच्या घरपोच जेवणाची सोय करायला सांगावी, म्हणजे मग जनता सरकारच्या नावानं शिमगा करणार नाही.

आयपीएलवाले बिनाप्रेक्षकांचे सामने खेळूनही पैसे मिळवतील, जनताही रविवारी घरात बसून क्रिकेट सामन्यांमुळे लॉकडाऊनही सुसह्य करून घेईल पण राज्यकर्ते क्रिकेटमधून जिंकण्याची वृत्ती शिकतील का, हा खरा प्रश्न आहे. नाही तरी घरी बसा, हे मामु माननीय मुख्यमंत्री सांगतच आहेत आणि ते महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेच्या घरातले सदस्य आहेत. त्यामुळे त्यांनीही घराघरात जनतेने बघितलेली जडेजाची जिंकण्याची वृत्ती अंगी बाणवावी आणि आपल्यात ती आहे, याचे दर्शन किमान पुढच्या फेसबुक लाइव्हमधे घडवावे, ही कळकळीची विनंती.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button