जखमी सिंहाप्रमाणे खेळला रविचंद्रन अश्विन, पत्नीने केले खूप इमोशनल पोस्ट

Ravichandra Ashwin & Wife

सामन्यात उभा रहाण्याच्या स्थितीत नव्हता रविचंद्रन अश्विन, तरीही सामना ड्रॉ करण्यात महत्वाची भूमिका बजावली. अश्विनच्या पत्नीने खूप भावनिक पोस्ट केली.

रविवारी रात्री अश्विनला खूप वेदना होत होती आणि तो सोमवारी सकाळी उठल्यावर सरळ उभा राहू शकत नव्हता. अश्विनची पत्नी प्रीतीने ही माहिती दिली. सिडनी क्रिकेट मैदानावर (SCG) खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी अश्विनने हनुमा विहारीबरोबर ६२ धावांची भागीदारी केली आणि टिकाऊ फलंदाजी करताना सामना अनिर्णित केला. अश्विनने १२८ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या. दोन्ही फलंदाजांनी ४० षटकांपेक्षा अधिक फलंदाजी केली.

कसोटी सामन्यानंतर अश्विनच्या पत्नीने ट्विट केले की, ‘हा व्यक्ती रात्री मोठ्या वेदनांसह झोपला होता. आज सकाळी उठल्यावर त्याला उभे राहणेही शक्य नव्हते. त्याला आपले शूज बांधण्यासाठीही वाकता येत नव्हते. आज रविचंद्रन अश्विनने जे केले त्यावरून मी आश्चर्यचकित आहे.’

रविंद्र जडेजाचा अंगठा जखमी झाल्याने अश्विनला वरच्या क्रमवारीत फलंदाजीला यावे लागले. पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याला दुखापत झाली होती. सामन्यानंतर ब्रॉडकास्टरशी बोलताना अश्विन म्हणाला की, विशेषतः पॅट कमिन्ससमोर फलंदाजी करणे कठीण होते. तो म्हणाला, ‘कमिन्स वेगळीच गोलंदाजी करीत होता. खेळपट्टीवर डबल बाऊन्स होता, त्यामुळे कमिन्ससमोर फलंदाजी करणे कठीण होते.’

३४ वर्षीय अश्विनने सामना संपल्यानंतर इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आणि लिहिले की, ‘फोटो बरेच काही सांगत आहे, ही भावना मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. माझ्या सर्व टीमच्या मित्रांचे आभार.’ अश्विनने आतापर्यंत या मालिकेच्या तीन सामन्यांमध्ये ७८ धावा केल्या असून एकूण १२ बळी घेतले आहेत. चार सामन्यांची मालिका सध्या १-१ ने अशी बरोबरीत आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत आता शुक्रवारी ब्रिस्बेन येथे सुरू होणारी चौथी कसोटी सामना जिंकू इच्छित आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER