रावेर लोकसभा : खडसेंची प्रतिष्ठा पणाला, दगा-फटक्याची शक्यता

Khadse-Mahajan

भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे राजकीय भवितव्य ठरविणारी निवडणूक रावेर लोकसभा मतदारसंघात होऊ घातली आहे. त्यांच्या सुनबाई आणि विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनाच पुन्हा भाजपा उमेदवारी देईल हे जवळपास निश्चित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीदिवसांपूर्वी  रावेर मतदार संघातील दौऱ्यात तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.

हि बातमी पण वाचा : भाजपच्या मुख्य निवडणूक समितीतून खडसेंना डच्चू, तर गिरीश महाजनांना स्थान!

रावेरमधील सहाही आमदार भाजपा-शिवसेना युतीचे आहेत. काँग्रेसचे या भागात एकेकाळी असलेले वर्चस्व आज पूर्णतः लयास गेले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस काही भागापुरती मर्यादित झाली आहे. भाजपाला मोठे आव्हान या मतदारसंघात दिसत नाही.स्वतः एकनाथ खडसे हे मुक्ताईनगरचे तर त्यांचे भाजपांतर्गत विरोधक राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जमनेरचे आमदार आहेत. मात्र केंद्रामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी रावेरची जागा एकदिलाने लढण्याचे आदेश महाजन व खडसे या दोघांनाही वरून देण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपात पाडापाडीचे राजकारण  होणार नाही ही बाब रक्षा खडसे यांच्या दृष्टीने दिलासादायक आहे. रक्षा यांना पुन्हा खासदार करण्यासाठी एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच भाजपाकडे तर एक शिवसेनेकडे आहे.काँग्रेस व राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही. चोपडामध्ये शिवसेनेचे चंद्रकांत सोनवणे आमदार आहेत. याशिवाय हरिभाऊ जावळे  – रावेर,संजय सावकारे -भुसावळ, गिरीश महाजन – जामनेर,एकनाथ खडसे – मुक्ताईनगर आणि चैनसुख संचेती मलकापूर हे भाजपाचे आमदार आहेत. जळगाव जिल्ह्यातील विधानसभेचे पाच मतदारसंघ आणि बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर हा एक विधानसभा मतदारसंघ ह्यांचा मिळून रावेर हा लोकसभा मतदारसंघ बनला आहे. 2009 मध्ये रावेर हा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात  आला. त्यावेळी पहिली निवडणूक भाजपाचे हरिभाऊ जावळे यांनी जिंकली होती. त्यांनी राष्ट्रवादीचे रवींद्र पाटील यांचा 22 हजार मतांनी पराभव केला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जावळे आमदार म्हणून निवडून आले. 2014 च्या मोदी लाटेत भाजपाच्या रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादीचे मनीष जैन यांचा तीन लाखाहूनही जास्त मतांनी पराभव केला. हा मतदारसंघ भाजपासाठी अत्यंत अनुकूल मानला जातो.

ही बातमी पण वाचा : सातारा लोकसभा : सातारा म्हणजे उदयनराजे, उदयनराजे म्हणजे सातारा

आपला मुलगा निखिल यांच्या अकाली मृत्यूनंतर एकनाथ खडसे यांनी सुनबाई रक्षा यांना राजकारणात आणले आणि थेट खासदार बनवले. रक्षा यांचे माहेर नंदुरबार जिल्ह्यातील आहे. माहेरून त्या गुजर समाजाचे आहेत तर खडसे हे लेवा पाटील समाजाचे आहेत. लेवा पाटील आणि गुजर या समाजांची रावेर मतदारसंघात फार मोठी संख्या आहे. त्यामुळे माहेरहून  गुजर आणि सासरहून लेवा पाटील असणे ही बाब रक्षा खडसे यांना फायदेशीर ठरली आहे.

रक्षा खडसे यांनी या मतदारसंघात चांगला संपर्क ठेवला आहे तसेच लोकसभेत देखील त्यांची कामगिरी पहिल्यांदा खासदार असूनही चांगल्यापैकी होती. एकनाथ खडसे यांनी मंत्रिपद गेल्यापासून ज्या पद्धतीने भाजपा नेतृत्वाला आव्हान देणारी भाषा अनेक वेळा वापरली त्यावरून खडसे यांची राजकीय सद्दी संपणार अशी भाकिते वर्तविली जात होती. खडसे हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील असेही बोलले गेले पण आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून सुनेसाठी ते त्यांची  ताकद पणाला लावतील हे स्पष्ट आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये  ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे.त्यांच्याकडे खडसे यांना आव्हान देऊ शकेल असा मजबूत उमेदवार नाही ही त्यांची डोकेदुखी आहे. भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, वारंवार वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये पराभूत झालेले रवींद्र पाटील यापैकी एकाला उमेदवारी मिळेल असे बोलले जाते. काँग्रेसने ही जागा स्वतः लढवण्याची तयारी दर्शवली होती पण राष्ट्रवादीने त्यास नकार दिला आहे.

ही बातमी पण वाचा : औरंगाबाद लोकसभा : काॅंग्रेसच्या उमेदवारावर खैरेंचे यश अवलंबून

भुसावळचे भाजपा आमदार माजी राज्यमंत्री संजय सावकारे हे खडसे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मात्र भाजपाच्या उर्वरित तीन आमदारांपैकी कोणीही खडसे यांना इतके जवळचे नाहीत. हरिभाऊ जावळे आणि खडसे यांचे संबंध पूर्वीसारखे मधूर राहिलेले नाहीत. परंतु गिरीश महाजन असोत किंवा हरिभाऊ जावळे असोत, खडसेंना अडचणीत आणण्यासाठी पक्षविरोधी भूमिका कधीही घेणार नाहीत ही बाब खडसे यांच्या पथ्यावर पडणारी ठरेल.

भाजपा शिवसेनेची युती झाली असली तरी शिवसेनेचे खडसे प्रेम सर्वपरिचित आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत खडसे यांच्या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुक्ताईनगरमध्ये जाहीर सभा घेतली होती.शिवसेनेने नेहमीच खडसे यांना टार्गेट केले आहे.असे असले तरी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यात स्थानिक पातळीवर खडसे यशस्वी होतील, असे म्हटले जाते.

समीकरणे 

रावेर लोकसभा मतदार संघात लेवा पाटील व मराठा समाज हे प्रभावशाली आहेत तसेच मुस्लिम, व ओबीसी समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. खुल्या प्रवर्गातील मतदार ३६ %, अनुसूचित जमाती १३ %, इतर मागास वर्गातील २६ % , अनुसूचित जातींचे ०८ % तर इतर १७ % मतदार आहेत.