काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य : विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून राऊतांची थोरातांविरोधात तक्रार

Nitin Raut & Balasaheb Thorat

मुंबई : राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची (Congress) अवस्था एकीकडे अध्यक्ष मिळेना आणि दुसरीकडे पक्षातील नेत्यांची नाराजी वेळोवेळी व्यक्त होताना दिसत आहे. या वेळी हे नाराजीनाट्य उघड झाले ते म्हणजे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावाच्या शिफारशीवरून. महाराष्ट्राचे प्रभारी एच.  के.  पाटील हे मुंबईत दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील दलित मतदार काँग्रेसपासून दूर गेला यासाठी राज्यातील दलित नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला सुशीलकुमार शिंदे, एकनाथ गायकवाड, नितीन राऊत, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात होते. नुकतीच राज्यपाल नियुक्त १२ नावांची शिफारस करण्यात आली. त्यात काँग्रेसकडून विदर्भातील कलावंत अनिरुद्ध वनकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. मात्र अनिरुद्ध वनकर यांनी वंचितकडून निवडणूक लढवली होती. त्यांच्या उमेदवारीवरून ह्या बैठकीत आक्षेप घेण्यात आला. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला राज्यात फटका बसला आहे.

याबाबत पक्षात मत जाणून घेण्यात आले नाही. काँग्रेस विरोधात निवडणूक लढवलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली, असा आक्षेप ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे नाव न घेता घेतला. काही मुद्द्यावरून मंत्रिमंडळात साथ मिळत नसल्याची नाराजीदेखील नितीन राऊत यांनी व्यक्त केली. काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आलेले मंत्रिपद हे  थेट जनतेशी संलग्न नाही.  त्यामुळे संपर्क मंत्र्यांनी जिल्ह्यात जाऊन जनतेशी संपर्क ठेवावा. पक्ष करत असलेले काम, सरकारचे निर्णय त्यांच्यापर्यंत पोहचवावे अशी चर्चादेखील बैठकीत झाली.

तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, भीमा कोरेगाव प्रकरण, पदोन्नतीतील आरक्षण या मुद्द्यांवरदेखील काँग्रेसच्या या बैठकीत चर्चा झाली. पण एकूणच बैठकीत प्रभारीसमोर नितीन राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष यांचे नाव न घेता नाराजी व्यक्त केली. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. लोकसभा निवडणुकीत अवघा एक खासदार निवडून आल्यानंतर पक्षाची राज्यातील अवस्था चिंतादायक झाली होती. विधानसभा निवडणूक कशीबशी लढले. सुदैवाने संधी मिळाल्याने राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाला. पण सत्तेत असलेल्या या महाराष्ट्र काँग्रेस पक्षातील कुरबुरी सतत समोर येत आहेत. कधी खात्यावरून नाराजी, कधी निधीवरून नाराजी, कधी उमेदवार न विचारता दिले म्हणून नाराजी उघड होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER