आरोग्यव्यवस्थेसाठी फडणवीस सरकारला दोष देणा-या राऊतांना स्मृतिभ्रंश झाला – राम कदम

Ram Kadam-Sanjay Raut

मुंबई : मागच्या पाच वर्षांत फडणवीस सरकारने (Fadnavis Govt) आरोग्यविषयक काम केले असते तर आज ज्या तात्पुरत्या सुविधा ‘जम्बो’ (Jumbo) म्हणून उभाराव्या लागल्या ते प्रमाण कमी झाले असते. विरोधी पक्षांच्या टीकेचा, आरोपांचा मुख्य भर हा जम्बो कोविड केंद्रांवरच आहे. ही केंद्रे धडपणे चालू द्यायची नाहीत- अशा शब्दांत शिवसेनेने आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

शिवसेनेच्या या टीकेवर भाजपा (BJP) नेते राम कदम (Ram Kadam) यांनी ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना सडेतोड उत्तर दिले आहे. आरोग्यव्यवस्थेसाठी फडणवीस सरकारला दोष देणा-या राऊतांना स्मृतिभ्रंश झाला आहे. फडणवीसांच्या सरकारमध्येही शिवसेनेचेच आरोग्यमंत्री होते हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा टोला राम कदम यांनी लगावला आहे. “संजय राऊत यांना नेमका स्मृतिभ्रंश झाला आहे की, जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी, स्वतःचं अपयश लपविण्यासाठी की, सुशांत सिंह प्रकरणात मोठे नेते, ड्रग माफियांना वाचवण्यासाठी मनघडण गोष्ट तयार केली जात आहे?” अशा शब्दांत राम कदम यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

काय म्हटले आहे सामनात?

पुण्यात वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्याच्या कोविड सेंटरमधून त्यांना खासगी रुग्णालयात न्यायचे ठरले, पण वेळीच रुग्णवाहिका मिळू शकली नाही व या दिरंगाईत तरुण पत्रकारास प्राण गमवावे लागले. तसेच, पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे हेसुद्धा कोरोनाग्रस्त झाले. त्यांच्या उपचारासाठी पुण्यात एकाही खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध होऊ शकला नाही. ससून इस्पितळात तरी त्यांच्यावर उपचार करा यासाठी पुण्याचे खासदार गिरीश बापट, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करावे लागले, पण काहीच उपयोग झाला नाही.

या अग्रलेखात विरोधकांवर सडकून टीका करण्यात आली. तसेच कोरोना काळात पुरेशा आरोग्य व्यवस्था नसण्याला फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. अग्रलेखात म्हटलं आहे, “वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी भरती आणि सुविधा योग्य निर्माण केल्या असत्या तर आजची परिस्थिती थोडीफार नियंत्रणात आली असती.

मागच्या पाच  वर्षांत फडणवीस सरकारने आरोग्यविषयक काम केले असते तर आज तात्पुरत्या जम्बो सुविधा उभारण्याची गरज कमी लागली असती. विरोधी पक्षांच्या टीकेचा आरोपांचा मुख्य भर जम्बो कोव्हिड केंद्रावर आहे. ही केंद्रे धडपणे चालू द्यायची नाहीत, त्यात काम करणाऱ्या डॉक्टर-नर्स यांच्यावर दबाव आणून दहशत निर्माण करायची असे राजकीय धोरण राज्याच्या गंभीर स्थितीस धोकादायक आहे. पुण्यातील राजकारण्यांनी याचे भान ठेवले तर पांडुरंग रायकर, दत्ता एकबोटे यांना जे भोगावे लागले ते इतरांच्या नशिबी येणार नाही. ” असंही यात नमूद करण्यात आलं आहे.

ह्या बातम्या पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER