राऊत यांना विरोधकांचा अन् घरच्यांचाही विजेचा शॉक

Nitin Raut

वीज बिलमाफीवरून पूर्णपणे यू-टर्न (U-Turn) घेणारे नितीन राऊत (Nitin Raut) यांच्यावर आता टीकेची झोड उठली आहे. केवळ विरोधकांनीच नाही तर त्यांच्याच पक्षातील मंत्र्यांनीही वीज बिल माफीची मागणी केल्याने आता हा विषय आणखीच जोर धरणार असे दिसते. लॉकडाऊनच्या काळातील बिल सर्वांना भरावेच लागेल असे राऊत यांनी मंगळवारी म्हटले होते. महावितरण मोठ्या तोट्यात आहे, त्यामुळे वीजबिल माफी देणे शक्य नाही असा कांगावाही त्यांनी केला. राऊत यांनी बुधवारी टिष्ट्वट करून सध्याच्या महावितरणच्या थकबाकीसाठी आधीच्या भाजप सरकारला जबाबदार धरले. भाजप सरकारच्या काळात महावितरणची एकूण थकबाकी ५० हजार कोटींच्या घरात गेली त्यामुळे आज वीजबिल माफी देता येत नाही असा सूर त्यांनी लावला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शांत कसे बसतील? त्यांनी तत्काळ पलटवार केला. आपले अपयश लपविण्यासाठी राऊत निराधार आरोप करीत असल्याचे वास्तव त्यांनी मांडले.महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. आधी वीज बिल माफीची घोषणा केली, आम्ही निर्णय घेतला आहे असेही बोलले.स्वत:चे कौतुक करणारे होर्डिंगदेखील लावून घेतले.दुसरीकडे लोकांना अव्वाच्या सव्वा दिलेल्या बिलात कुठलीही कमी केली नाही. आहे ती बिले भरावीच लागतील अशी सक्ती करणारे पत्रक काढून लोकांची फसवणूक केली असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.  आता पैसा नसल्याचे कारण देत वीज बिल माफी देणार नाही असे सांगत आहेत. नितीन राऊत चुकीची माहिती देत आहेत, त्यांनी अभ्यास करून बोलावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

काँग्रेसकडे असलेल्या खात्यांना पुरेसा निधी दिला जात नसल्याबद्दल काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये नाराजीची भावना आहे. वाढीव वीज बिलात सवलत मिळावी म्हणून १८०० कोटी रुपये शासनाने द्यावेत, असा प्रस्ताव राऊत यांच्या ऊर्जा विभागाने दिलेला होता. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वित्त विभागाने तो फेटाळला. त्याचवेळी शिवसेनेकडे असलेल्या परिवहन विभागाच्या अखत्यारितील एसटी महामंडळाला एक हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली. काँग्रेसच्या खात्यांबाबत होत असलेल्या या दुजाभावावर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नेमके बोट ठेवले. नागपुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, एसटी महामंडळाला पैसा दिला जाऊ शकतो तर वाढीव वीज बिलमाफीसाठी का नाही? या मुद्यावर लोकांची भावना तीव्र आहे. वाढीव वीज बिल माफ करा अशा मागण्यांची निवेदने आमच्याकडे येत आहेत, असे सांगत हा विषय संपलेला नाही, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा होईल, असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत. भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी तर वीज बिलेच भरू नका असे आवाहन जनतेला केले आहे.

राज ठाकरे काय बोलणार?

वाढीव वीज बिलाविरुद्ध रान उठविणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे गुरुवारी त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत. त्यासाठी त्यांनी मनसेच्या नेत्यांची बैठक मुंबईत बोलविली आहे. राज हे वाढीव वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटले होते. तसेच त्यांनी त्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाही फोन केला होता. वाढीव बिलाविरुद्ध तीव्र आंदोलनाची घोषणा राज उद्या करतील अशी शक्यता आहे.

लॉकडाऊनच्या काळात एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये मीटर रिडिंग न करताच जनतेला अव्वाच्या सव्वा बिले पाठविण्यात आली होती. त्या विरुद्ध आक्रोश आहे. त्या आक्रोशाची दखल घेत वीज बिलातून दिलासा दिला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही म्हटले होते. स्वत: नितीन राऊत यांनी त्या बाबत वारंवार ग्वाही दिली होती पण आता त्यांनी सपशेल यू-टर्न घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER