हे राहुल गांधींचेही ऐकत नाहीत

Moreshwar Badge‘मुकुल वासनिक माझे ऐकत नाहीत’ असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यावरून बराच गहजब झाला. चंद्रपूरचा उमेदवार हायकमांडला बदलावा लागला. न ऐकण्याची तक्रार करणारे अशोकराव पहिले नाहीत. देवेंद्र फडणवीस नवेनवे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनीही ‘अधिकारी माझे ऐकत नाहीत’ अशी तक्रार पत्रकारांकडे केली होती. आता अशी तक्रार करायची पाळी खुद्द काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर आली आहे. रामटेकचे तिकीट नितीन राऊत यांनाच द्यावे असे खुद्द राहुलबाबाने सांगूनही विरोधकांनी शेवटपर्यंत एबी फॉर्म त्यांच्यापर्यंत पोचू दिला नाही. आहे की नाही गंमत?

ही बातमी पण वाचा :- बिग फाईट ; आंबेडकर लढताहेत एका महास्वामीशी

हा किस्सा आहे लोकसभा निवडणुकीच्या रामटेकच्या तिकिटाचा. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होऊनही काँग्रेसमधली गटबाजी थांबायला तयार नाही हे दाखवायला हा सुंदर नमुना आहे. रामटेकसाठी उमेदवारी अर्ज भरायची मुदत सोमवारी संपली. रामटेकची उमेदवारी रविवारी रात्री किशोर गजभिये यांना जाहीर झाली होती. सोमवारी सकाळी दिल्लीत कार्यकारिणीच्या बैठकीत रामटेकचा मुद्दा आला तेव्हा राहुल गांधींच्या नजरेस हे आले. ‘नितीन राऊत हे पक्षाच्या अनुसूचित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनीच लढायला पाहिजे’ असे राहुलबाबा म्हणाले आणि पक्षात एकच धावपळ सुरु झाली. नागपुरात राऊत यांना मोबाइल लावण्यात आला. पण संपर्क होत नव्हता. शेवटी पक्षाच्या नागपूर कार्यालयात निरोप ठेवण्यात आला. निरोप मिळाल्यावर राऊत यांनी दिल्लीशी संपर्क साधला तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, ‘तुमचा ए बी फॉर्म नागपुरात पक्षाकडे तयार आहे. तुम्ही लगेच अर्ज भरा.’ राऊत यांनी फॉर्म मिळवण्यासाठी धावपळ केली. बऱ्याच नखऱ्यानंतर जमले. पण तो पर्यंत फॉर्म देण्याची वेळ निघून गेली होती. तिकीट हुकण्याचा असाच एक प्रसंग काही वर्षांपूर्वी सुबोध मोहिते यांच्यासोबत घडला आहे. निरोप उशिरा मिळाल्याने त्यांचे विमान मुंबईत पोचले तेव्हा फॉर्म देण्याची वेळ संपली होती.

विदर्भातील काँग्रेसच्या तिकिटांवर राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांची छाप दिसते. रामटेकला वसनिकांच्या नावाची चर्चा होती. पण वासनिकांना तिकीट दिले तर आपण विरोधात काम करू अशी धमकी आमदार सुनील केदार यांनी दिली होती. केदारांनी नितीन राऊत यांचे नाव लावून धरले होते. तो वाद राऊत यांना भोवलेला दिसतो. पण वरच्या पातळीवर एवढी गटबाजी चालत असेल तर देवच काँग्रेसचे रक्षण करो असे म्हणावे लागेल. तिकिट वाटपानिमित्ताने गेल्या आठवड्यात झालेल्या तमाशाने काँग्रेसची नाचक्की झाली. त्याला जबाबदार कोण? कुणावर कारवाई होणार आहे की नाही? कुणीही बोलायला तयार नाही. नगरच्या तिकिटासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा भाजपात गेला.

विखे पाटील सध्या युतीच्या प्रचाराच्या बैठका करीत आहेत. त्यांना थांबवायला कुणाला वेळ नाही. अशोक चव्हाण यांना विचारले तर ते कानावर हात ठेवतात. आता बोला. पूर्वी मनसेमध्ये असलेल्या एक नेत्याला औरंगाबादमधून तिकीट हवे होते. ते जमले नाही म्हणून आमदार अब्दुल सत्तार यांनी बंडाची धमकी दिली. पण पक्ष त्यांना जाब विचारायला तयार नाही. सारा सावळागोंधळ सुरु आहे. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. ४८ जागांसाठी एवढा गोंधळ आहे. सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यावेळी काय परिस्थिती असेल याची कल्पनाच करवत नाही.

मोरेश्वर बडगे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार)