काँग्रेस नेते अब्दुल सत्तार आणि अर्जून खोतकरांच्या गुप्त बैठकीने खळबळ

औरंगाबाद : जालन्यात शिवसेनेचे अर्जून खोतकर रावसाहेब दानवे यांच्या उमेदवारीवर अजूनही नाराज असून आज औरंगाबादमध्ये खोतकर यांची काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांच्यासोबत गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत अब्दुल सत्तार यांच्याकडे 2 दिवसांचा कालावधी मागितला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शहरातील सातारा परिसरातील एका प्रसिद्ध बिल्डरच्या घरी सायंकाळी ही गुप्त बैठक पार पडली असून यावेळी अब्दुल सत्तारांनी खोतकरांना 24 तासांचा अल्टिमेटम दिल्याची माहिती आहे. शिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेविरुद्ध लोकसभा निवडणूक लढवणार कि नाही याचा खुलासाही मागितला आहे. यावर खोतकरांनी 2 दिवसांचा कालावधी मागितला असल्याचे सुत्रानी सांगितले आहे.

जालन्यातून भाजपचे उमेदवार म्हणून रावसाहेब दानवे यांना उमेदवारी जाहीर झाली असून युतीकडून अर्जून खोतकर यांना जालनासह मराठवाड्यातील मतदारसंघात समन्वययाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. समन्वयाची जबाबदारी सोपविली याचाच अर्थ खोतकरांना उमेदवारी नाकारण्यात आल्याचे स्पष्ट आहे. परंतु खोतकरांनी आपण अजूनही मैदानात असल्याचे म्हटले असून अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील असे सांगत माघार घेण्यास नकार दिला आहे. एवढेच नव्हे तर शिवसैनिकांनीही खोतकरांनाच उमेदवारी मिळावी, यासाठी दबाव टाकला आहे.

ही बातमी पण वाचा : ‘जालन्यातून खोतकरांनीच लढावे अन्यथा शिवसेना भवनावरून उडी मारून आत्महत्या’

दुसरीकडे जालन्यातून काँग्रेसने कल्याण काळे यांना उमेदवारी दिली आहे. बुधवारी औरंगाबादेतील पत्रपरिषदेत अब्दुल सत्तार यांनी अर्जून खोतकरांबद्दल सूचक वक्तव्य केले होते. खोतकर उभे राहिले तर 2 लाखांनी निवडून येतील पण त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचे सत्तार म्हणाले होते.

सत्तार यांच्या या विधानानंतर आज खोतकरांसोबत गु्प्त बैठक पार पडली आहे. शिवसेनेकडून अजूनही खोतकरांबद्दल अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे खोतकर काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागले आहे.