थ्रीडी रांगोळी स्पर्धेत रत्नागिरीच्या राहुल कळंबटेचे यश

3D Rangoli Tournament in ratnagiri

रत्नागिरी /प्रतिनिधी :- रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील राहुल कळंबटे याने सांगली येथे झालेल्या ‘थ्रीडी रांगोळी’ या अनोख्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.

राहुल कळंबटे याला रांगोळी काढण्याचा छंद आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढत असतानाच तज्ज्ञ रांगोळीकारांनी काढलेल्या रांगोळी तो हुबेहूब रेखाटू लागला. किंबहुना त्यापेक्षा अधिक सुबक रांगोळी तो काढू लागला. गेली सात वर्षे तो रांगोळी रेखाटत आहे. मालगुंड आणि परिसरातील लग्नसोहळा, वाढदिवस तसेच अन्य विविध कार्यक्रमांत त्याने काढलेल्या रांगोळ्यांचे कौतुक करण्यात येत असे. नुकत्याच सांगली येथे झालेल्या थ्रीडी रांगोळी स्पर्धेत मुंबई, पुणे, सातारा, सांगली, इस्लामपूर येथील कलाकार सहभागी झाले होते. कोणाचेही मार्गदर्शन नसताना केवळ निरीक्षणातून आत्मसात केलेल्या कलेतील रेखीवता, सुबकतेसाठी घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले आहे. प्रथमच जिल्ह्याबाहेरील स्पर्धेत सहभागी होत राहुलने यश मिळवले आहे. ग्रामीण भागातील युवकाने केवळ आत्मविश्वास, जिद्द, चिकाटीच्या जोरावर यश मिळवल्याने राहुलचे कौतुक करण्यात येत आहे.