रत्नागिरीची आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या विळख्यात

Corona Patient

रत्नागिरी/प्रतिनिधी : अपुऱ्या सुविधा आणि ढिसाळ नियोजन यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा हळूहळू कोरोनाच्या विळख्यात सापडू लागली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरूवातीपासून कोरोना रूग्णसंख्या मर्यादित ठेवण्यात येथील आरोग्य यंत्रणेचा मोठा वाटा होता. चाकरमान्यांना आणण्याचा निर्णय घेतल्यानंतर मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर त्याचा मोठा ताण पडू लागला.

त्याही परिस्थितीत कोरोना योद्ध्यांनी आपले काम जबाबदारीने सुरू ठेवले होते. मात्र आता रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना कोरोना योद्ध्यानाच कोरोनाची लागण होऊ लागली आहे. सुरुवात नर्सिंगच्या मुलींना कोरोनाची लागण होण्यापासून झाली. त्या बर्‍या झाल्या परंतु गेल्या आठ दिवसात शासकीय रूग्णालयातील अनेक कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आल्याने चिंता वाढली आहे.

राजापूर येथे कोरोना योद्ध्याची भूमिका बजावणार्‍या वैद्यकीय अधिकारी व त्यांच्याबरोबर काम करणार्‍या त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रत्नागिरीत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जर आरोग्य योद्धेच कोरोनाग्रस्त होवू लागले तर उपचार करणार्‍या यंत्रणेवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यातच दापोली येथील कोरोना योद्ध्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे उपचार करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांत देखील चिंता निर्माण झाली आहे. मॅग्मोच्या अध्यक्षानीदेखील पुरेशा संख्येने पीपीई कीट व अन्य सुरक्षाविषयक सुविधा आरोग्य कर्मचार्‍यांना मिळाल्या तर आरोग्य कर्मचारी बाधित झाले नसते असे म्हटले आहे. याबाबत ढिसाळ नियोजन असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER