आजीच्या आठवणीने रसिका झाली भावूक

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळी नाती असतात. या नात्यांच्या मालिकेतील सर्वात ऊबदार नातं म्हणजे आपल्या आजीसोबतचं. आपल्या प्रत्येकाचे लहानपण आजीकडून गोष्टी ऐकण्यात, तिच्याकडून चिऊ-काऊचा घास खाण्यात, तिने थोपटल्यानंतर शांत झोपी जाण्यामध्ये आनंद असतो. आजीसोबत आठवणींचं आकाश प्रत्येकासाठी भरलेलं असतं. अभिनेत्री रसिका (Rasika) सुनील हिच्याही आयुष्यात आजी नावाचं गाव गजबजलेलं होतं. मात्र आजीच्या जाण्याने हे तिचं गावात सूनंसूनं झाले आहे. तिच्या आजीचे नुकतंच निधन झालं असून तिने तिच्या सोशल मीडिया पेजवर आजीच्या आठवणी शेअर केल्या आहेत. आजीच्या आठवणीने ती भावूक झाली आहे.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये शनाया हे पात्र चुलबुल्या अभिनयाने लोकप्रिय करणारी रसिका सुनील ही खरंतर तिच्या रसिका या नावापेक्षा शनाया या नावाने प्रसिद्ध झाली आहे. सुरुवातीला मालिकेतील राधिका आणि गुरुनाथ यांच्या संसारात खो घालणाऱ्या
शनायाचा राग न येणारी व्यक्ती दुर्मिळ असेल. पण सध्या मालिकेमध्ये शनाया सुधारली असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या मालिकेतील राधिकाचे तर चाहते होतेच पण आता सुधारणा सुधारलेल्या शनायाचे म्हणजेच रसिकाचेही चाहते वाढले आहेत. रसिकांनी गेल्यावर्षी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून ब्रेक घेतला होता. अभिनयातील पुढच्या शिक्षणासाठी ती परदेशात गेली होती. आता पुन्हा या मालिकेमध्ये नव्या जोमाने काम करत आहे.

रसिका तिच्या खऱ्या आयुष्यात तिच्या आजीच्या खूप जवळ होती. शनाया सांगते, माझे बाबा नोकरीसाठी परदेशात असल्यामुळे भारतात आम्ही आई आजी-आजोबा यांच्यासोबतच राहायचो. त्यामुळे लहानपणी आजीसोबत घालवलेले अनेक क्षण मला ती गेल्यानंतर सारखे आठवू लागले आहेत. मी लहानपणी जेव्हा आजारी पडायचे तेव्हा आई पेक्षा जास्त आजीकडूनच सेवा करून घ्यायचे. आजी शिवाय माझे पानही हलायचं नाही. शाळा-कॉलेज नंतर मी जेव्हा अभिनयात करिअर करायचं ठरवलं तेव्हा देखील आज्जीनेच मला खूप पाठिंबा दिला होता. मी माझं कोणतही काम आजीला शेअर करायचे. जेव्हा मी राधिकाला शनाया म्हणून मालिकेत त्रास द्यायचे तेव्हा आजीकडून मी ओरडा खाऊन घेतला आहे ,पण तिलाही माहिती असायचं की ही मालिका आहे. खरंतर तिला हे पटायचं. पण मालिकेतही आपली रसिका ही शहाणी मुलगीच असली पाहिजे हे तिचं भाबडं मत मला नेहमीच एक वेगळाच आनंद द्यायचं. ती खुप सुगरण होती. तिला खूप काही गोष्टी येत होत्या आणि प्रचंड उत्साही होती. खरंच आता आज्जी आयुष्यात नाही या विचाराने पण मला वाईट वाटत आहे. रसिकाने तिच्या आजीसोबतचे फोटो तिच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केले आहेत. गेल्या काही दिवसात अनेक सेलिब्रिटी कलाकारांच्या जवळच्या नातेवाइकांचे निधन झाल्याच्या बातम्या त्यांनी शेअर केल्या होत्या. त्यामध्येच अभिनेत्री ईशा केसकर हिच्या वडिलांचे निधन झाले त्यावेळी देखील तिने भावूक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली होती. मिथिला पालकर ही अजूनही तिच्या दादरमधल्या जुन्या घरात आजी-आजोबांसोबत राहते. कोरोना काळात तिच्या आजी-आजोबांना बरं नव्हतं त्या काळात ती खूप अस्वस्थ झाली होती आणि अशीच भावूक पोस्ट टाकून तिने चाहत्यांशी संवाद साधला होता. आपल्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यातील त्यांच्या अतिशय जवळ असलेले नातेवाईक त्यांच्या आयुष्यातून वजा होतात तेव्हा त्यांची भावनिक अवस्था त्यांचे चाहते नक्कीच समजून घेत असतात आणि म्हणूनच जेव्हा रसिकानेही तिच्या आजीच्या आठवणी इन्स्टा पेजवर फोटोसह शेअर केल्या तेव्हा तिलादेखील चाहत्यांच्याकडून एक आधाराचा हात कमेंटमधून मिळाला. शेवटी कितीही झालं, कलाकार सेलिब्रिटी असले तरी त्यांच्यातले माणूसपण हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या अशा गोष्टींमुळे टिकून असतं. रसिकाच्या मनातही तिच्या आजीविषयी असलेलं स्थान हे असच एका संवेदनशील मनाचं प्रतिक आहे. यापुढे तिची आजी तिच्या आयुष्यात नसेल मात्र मनात नक्की असेल असे सांगत तिच्या चाहत्यांनी तिला धीर दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER