
एखाद्या मालिकेतील नायिकेला नेहमीच प्रेक्षकांचे प्रेम जास्त मिळते. दोघांच्या सुखी संसारात बिब्बा घालणारी ‘वो’ कधीच कुणाला आवडत नाही. पण कबाब में हड्डी बनलेली खलनायिकाही गोड वाटावी हा ट्रेंड सेट केला तो ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील शनाया अर्थात अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil) हिने. राधिकाच्या गुरूला जाळ्यात ओढणाऱ्या शनायाला तुफान लोकप्रिय करणाऱ्या रसिका सुनीलला तिच्या खऱ्या आयुष्यातील गॅरी मिळाल्याचे संकेत तिने दिले आहेत. त्यामुळे आता रसिकाचं जमलं असं म्हणायला हरकत नाही.
थेट लॉस एंजिलिसमधून रसिकाने तिच्या आयुष्यातील आदित्य बिलागी या खास व्यक्तीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. गेल्या काही दिवसांत एक बातमी फिरत होती ती म्हणजे, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया लग्न करून अमेरिकेत जाणार आणि राधिका मसाले कंपनीची शाखा अमेरिकेत सांभाळणार. मालिकेत असलेल्या या कथेच्या टर्नमागे शनायाची भूमिका करणाऱ्या रसिकाच्या खऱ्या आयुष्यात आलेल्या रोमँटिक वळणाची किनारहोती हे नुकत्याच रसिकाने आदित्यसोबत पोस्ट केलेल्या फोटोने दाखवून दिले आहे. जेव्हा मालिकेत कलाकार परदेशात गेल्याचे दाखवले जाते तेव्हा खऱ्या आयुष्यातही कलाकारांनी सुटी घेतलेली असते हे आता प्रेक्षकांना कळून चुकले आहे. त्यामुळे ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत रसिका दिसत नाही याचा अर्थ ती कुठे आहे तेही आता तिच्या चाहत्यांना कळले आहे.आदित्य बिलागीसोबतचे रसिकाचे खास फोटोसेशन हा सध्या तिच्या चाहत्यांमध्ये औत्सुक्याचा विषय आहे.
हो, मी आदित्यसोबत सुटीचा आनंद घेत आहे, असं तिनं एका फोटोच्या कॅप्शनमध्येच लिहिल्याने तिचे चाहते तिच्यासाठी खूश आहेत. आदित्यसोबतच्या फोटोवरून हे दिसून येत आहे की, रसिका आणि आदित्यने आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. रसिकाने तिच्या सोशल मीडिया पेजवर हे फोटो शेअर करत म्हटले आहे की, गेल्या वर्षाने प्रत्येकालाच आयुष्याची, नात्याची किंमत सांगितली. कृतज्ञतेचा नवा अर्थ सरत्या वर्षाने दिला. माझ्या आयुष्यात तू मला कृतज्ञ होण्याची जाणीव दिलीस म्हणून तू माझ्यासाठी खास आहेस. रसिकाचे हे शब्द आणि आदित्यसोबतचे रोमँटिक फोटो खूप काही सांगून जाणारे आहेत. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेला प्रेक्षकांनी खूप प्रतिसाद दिला. आता ही मालिका घेणार निरोप अशा बातम्यांना दाद न देता ही मालिका टीआरपीच्या रेटिंगवर टिकून राहिली. गेल्या वर्षी शनायाची भूमिका टॉपवर असतानाच रसिकाने या मालिकेतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता.
खरं तर हा निर्णय तिच्या चाहत्यांना धक्का देणारा होता. अभिनयाच्या विशेष प्रशिक्षणासाठी रसिकाने अमेरिकेला जायचे ठरवले आणि त्यासाठी तिने मालिका सोडली. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये रसिका पुन्हा भारतातही परतली आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतही. तिच्या जागी शनाया साकारणाऱ्या ईशा केसकर हिच्या दाढेचे दुखणे वाढल्याने तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पुन्हा शनाया बनून रसिका मालिकेत दाखल झाली. अमेरिकेत असताना रसिकाची भेट आदित्यशी झाल्याचे बोलले जात आहे. आता आदित्य रसिकाला कधी आणि कुठे भेटला हे अजून तरी तिने सांगितलेले नाही. पण आताही या मालिकेतून ‘शनायाची होणार एक्झिट’ अशा बातम्या येत आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आदित्यसोबतचे फोटो शेअर करून पुन्हा अमेरिकेत बस्तान बसवण्याचा विचार रसिका करत असेल तरत्यात नवल ते काय?
View this post on Instagram
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला