आमचं ठरलंय, जय महाराष्ट्र म्हणायचं’, राष्ट्रवादीच्या रणरागिणी शिवसेनेत प्रवेश करणार?

rashmi-bagal-enter-in-shivsena

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, अनेक मातब्बर नेते आणि आमदार शिवसेनेत प्रवेश करतांना दिसून येत आहे. आणि राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का म्हणजे सोलापुरात बसतांना दिसतोय. कारण बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेत प्रवेश करणार हे निश्चित मानले जात असतांना जिल्ह्यातील आणखी एक रणरागिणी करमाळ्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल-कोलते ह्या यांनी शिवबंधन हाती बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

ही बातमी पण वाचा : उमेदवारी मिळण्याची खात्री मिळाल्यानेच, उद्या शिवबंधन हाती बांधणार – रश्मी बागल

लोकसभा निवडणुकीत उत्तम काम करूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्याची कदर करण्यात आली नाही. पक्षाने मला डावललं, राष्ट्रवादीत कामाची कदर नाही, असा आरोप रश्मी बागल यांनी केला आहे. रश्मी बागल यांच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या गटाने ‘आमचं ठरलंय… जय महाराष्ट्र’ अशा आशयाच्या ओळी फेसबुकवर टाकल्याने त्यांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाला आहे, अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.

ही बातमी पण वाचा : “कर्जत जामखेडच्या भूमीत, दिले आशीर्वाद या मातीने, जिंकू लढाई तुमच्या साथीने”…

१९ ऑगस्टला बागल गटाने कार्यकर्त्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून त्या शिवसेना प्रवेशाची घोषणा करू शकतात. तर २० तारखेला शिवसेना प्रवेश करणार असल्याची चर्चा बागल गोटात सुरू आहे. याबाबत कार्यकर्त्यांना या बैठकीची नोटीस देखील पाठवण्यात आली आहे. ‘शिवबंधन हाती बांधण्याची वेळ आली आहे. याविषयीची सविस्तर चर्चा झाली असून शिवसेना आपल्याला तिकीट द्यायला तयार आहे. यावर रश्मी दिदींना अनुमती देण्यासाठी बागल गटावर प्रेम करणाऱ्या, खंबीरपणे पाठीशी उभे राहणाऱ्या, निष्ठावान आणि प्रामाणिक पणे कोणत्याही परिस्थितीत बागल गटाला साथ देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी सोमवारी दिनांक १९/८/२०१९ रोजी सकाळी १० वाजता बागल संपर्क कार्यालयात यावे. सर्वांना ही नम्र विनंती आहे.’, अशी पोस्ट रश्मी बागल यांचे धाकटे बंधू दिग्विजय बागल यांनी फेसबुकवर टाकली आहे.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीची गळती सुरूच ; राणाजगजितसिंह पाटील भाजपच्या वाटेवर