राशिद खान कंजुसातील महाकंजूस

Rashid Khan SRH

राशिद खान (Rashid Khan) हा आपल्या कसलेल्या गोलंदाजीने कंजुसातील महाकंजूस गोलंदाज ठरला आहे. आयपीएलमध्ये (IPL) धावांची बरसात होत असली, षटकार-चौकारांची आतषबाजी होत असली तरी राशिद खानच्या गोलंदाजीवर मात्र धावा निघणे मुश्कील असते. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने आपल्या २४ षटकांत फक्त ४.८३ च्या दराने धावा दिल्या आहेत. यावरून तो किती नियंत्रित मारा करतोय, फलंदाजांना कसा जखडून ठेवतोय ते दिसून येईल. गुरुवारी पंजाबविरुद्धसुद्धा त्याने चार षटकांत फक्त १२ धावा दिल्या आणि तीन गडीसुद्धा बाद केले.

त्यात एकावेळी सनरायजर्सच्या (SRH) छातीत धडकी भरवणाऱ्या निकोलस पूरनच्या विकेटचाही समावेश होता; शिवाय त्याने निर्धाव षटकही टाकले आणि त्यात विकेटही काढल्या. या राशिद खानचे सुनील गावसकर यांनीसुद्धा कौतुक केले आहे. त्याच्या कौतुकात त्यांनी म्हटलेय की, तो प्रत्येक वेळी आपल्या ‘टारगेट’वर कायम असतो, भरकटत नाही. कोणत्याही कर्णधाराला आपल्या संघात तो असायलाच हवा, असे वाटावे असा हा खेळाडू आहे. आयपीएलमध्ये आपल्या कोट्याची पूर्ण चार षटके गोलंदाजी करून १२ पेक्षा कमी धावा देणाऱ्या कामगिरीच्या डेल स्टेनच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली.

डेल स्टेनने ९४ सामन्यांमध्ये चार वेळा गोलंदाजीत पूर्ण चार षटकांत १२ पेक्षाही कमी धावा दिल्या आहेत. राशिद खानने हीच कामगिरी ५२ सामन्यांतच म्हणजे स्टेनपेक्षा जवळपास निम्म्याच सामन्यात केली आहे. स्टेनएवढे ९४ सामने खेळलेला असेल तेव्हा ही कामगिरी तो कुठवर नेईन सांगता येत नाही. पंजाबविरुद्ध त्याने आपले शेवटचे षटक निर्धाव टाकताना त्या एकाच षटकात दोन गडीसुद्धा बाद केले.

राशिदपासून नाॕन स्ट्रायकयरला लांब ठेवण्यासाठी निकोलस पूरनने सलग चार चेंडूंवर धाव घेतली नाही आणि पाचव्या चेंडूवर थेट क्षेत्ररक्षकाच्या हाती चेंडू टोलला. या प्रकारे पूरन ३७ चेंडूंत ७७ धावा काढत बाद झाला आणि सामना सनरायजर्सच्या हातात आला. पुढल्याच चेंडूवर त्याने मोहम्मद शामीलाही पायचित पकडले. आपला गोलंदाजीचा कोटा संपला नाही तर कदाचित त्याने हॅट्ट्रिकही केली असती. आयपीएलमध्ये निर्धाव षटकात एकापेक्षा अधिक विकेट काढणाऱ्या प्रवीण कुमार, लसिथ मलिंगा, हरभजनसिंग आणि संदीप शर्मा यांच्या पंक्तीत तो आता जाऊन बसलाय.

आपले हे यश त्याने अलीकडेच अपघातात मृत्युमुखी पडलेला आपला मित्र अफगाणी फलंदाज नजीब तरकाई याला समर्पित केले आहे. तो आमचा अतिशय चांगला मित्र होता. त्याचे अपघाती निधन- अशा बातम्या ऐकल्यावर फार मोठा धक्का बसतो, असे त्याने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER