महाबळेश्वरात सापडला पांढऱ्या रंगाचा दुर्मिळ शेकरू

सातारा : महाराष्ट्राचा राज्यप्राणी अशी ओळख असलेला शेकरू महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळतो. महाबळेश्वरच्या तहसीलदार कार्यालयानजीक असलेल्या जांभळाच्या झाडावर पांढऱ्या रंगाचा दुर्मिळ शेकरू कॅमेऱ्यामध्ये कैद झाला.

सहसा शेकरूंची पाठ तपकिरी, पिवळसर-पांढरा गळा, तोंडावर रुबाबदार लांब मिशा, लांब सुळ्यासारखे दात, पायाला टोकदार वाकडी नखे असतात. मात्र, या पांढऱ्या रंगाच्या शेकरुंचे डोळे गुलाबसर होते. इंग्रजीमध्ये शेकरूस इंडियन जायंट स्क्विरल नावाने ओळखले जाते. भारतात जायंट स्क्विरल प्रजातीच्या एकूण 7 उपप्रजाती आढळतात. महाराष्ट्रात भीमाशंकर, फणसाळ, आंबा घाटाजवळील जंगलात, आजोबा डोंगररांगांत, माहुली व वासोटा परिसरात शेकरू आढळतो. मेळघाट अभयारण्य, ताडोबा राष्ट्रीय उद्यान येथेही तो दिसतो. विविध प्रकारची फळे व फुलातील मधुरस हे त्याचे खाद्य असते. शेकरूचे वजन दोन ते अडीच किलो व लांबी अडीच ते तीन फूट असते. त्याला गुंजेसारखे लालभडक डोळे, मिशा, अंगभर तपकिरी तलमकोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांबलचक शेपूट असते. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर लिलया झेप घेणारा शेकरू 15 ते 20 फुटांची लांब उडी घेऊ शकतो. त्यामुळे याला उडणारी खारदेखील म्हणतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER