राजगुरुनगर वाचनालयाची झेप सातासमुद्रापार…

Rajgurunagar library.jpg

Shailendra Paranjapeजनरल नेटिव्ह लायब्ररी खेड, या १८६२ मध्ये स्थापन झालेल्या ग्रंथालयातल्या दुर्मिळ २४ पुस्तके आणि एका हस्तलिखितासह एकूण ६३०० पानांच्या अमूल्य ज्ञानभांडाराचं डिजिटल स्वरूपात रूपांतर झालंय. नुसतं डिजिटल रूपातच हे रूपांतर झालंय असं नव्हे तर हे सर्व साहित्य विकिमीडिया कॉमन्स या प्रकल्पात Books in Marathi या मुख्य वर्गातील ‘Books with Public Library, Rajgurunagar published before 1900’  या उपवर्गात उपलब्ध झाले आहे. विकिस्रोत  या प्रकल्पात युनिकोडमध्येही ते उपलब्ध आहे. वाचक, अभ्यासक, जिज्ञासू यांना हा ठेवा मुक्तपणे व मोफत वापरता तर येईलच; पण लिंक पाठवून, डाऊनलोड करूनही त्याचा प्रसार करता येईल.

सा विद्या या विमुक्तये, मुक्ती देणारी ती विद्या. जीवनाचं तत्त्वज्ञान प्रत्यक्ष रणांगणावर अर्जुनाला सांगताना भगवान श्रीकृणाने भगवद्गीता अर्थात कर्मयोग सांगितला. तोच कर्मयोगाचा संदेश सोप्या भाषेत आणला संत ज्ञानेश्वर महाराजांनी, लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य लिहून तो विसाव्या शतकातल्यांना उपलब्ध करून दिला.

आपल्या देशातल्या मौखिक परंपरेचा ठेवा लिखित स्वरूपात आलाय, टिकलाय, चिरकाल टिकेलही; पण तो चिरकाल टिकण्यासाठी मौखिक परंपरेतून लेखी स्वरूपात जतन झालाय, तसाच आताच्या काळात भावी पिढ्यांसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अंकीय स्वरूपात डिजिटाइझ होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तेच काम राज्य सरकारच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून होतंय. त्याचं स्वागतच करायला हवं.

१०० वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या महाराष्ट्रातल्या ८७ वाचनालयांसाठी राज्य मराठी विकास संस्थेनं २०१८ मध्ये  डिजिटायझेशनची कार्यशाळा घेतली होती. त्यातून या पतदर्शी प्रकल्पाचा पहिला मानकरी होण्याचा मान राजगुरुनगरच्या या सार्वजनिक वाचनालयानं मिळवला आहे, असं वाचनालयाचे मानद सचिव राजेंद्र सुतार यांनी सांगितलं.

राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात डिजिटायझेशनसाठी संस्थेनं आर्थिक सहयोग केल्याचं सांगितलं. ही प्रक्रिया निरंतर चालूच राहणार असून वाचक, अभ्यासक, जिज्ञासू यांना ठेवा मुक्तपणे व मोफत वाचता व उतरवून (डाऊनलोड करून) घेता येणार आहे.

विज्ञान आश्रम पाबळ येथील संस्थेचे संचालक योगेश कुलकर्णी यांनी या डिजिटायझेशन प्रकल्पातील स्कॅनिंग, विकी प्रकल्पात अपलोड करणे आणि ओसीआर प्रक्रिया  करून युनिकोडमध्ये रूपांतर करण्याचे काम ग्रामीण भागातील युवतींनी पूर्ण केल्याचे सांगितले. त्यामुळे या भागातील मुलींना आधुनिक कौशल्ये आणि रोजगारसंधी उपलब्ध झाल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.

हा सर्व ठेवा मुक्त ज्ञानस्रोत   प्रकल्पांतर्गत पूर्ण करण्याचे काम करणारे प्रोग्राम ऑफिसर, सेंटर फॉर इंटरनेट अॅन्ड सोसायटीचे कार्यक्रम अधिकारी सुबोध कुलकर्णी यांनी सांगितले की, विस्मृतीत गेलेले व शोधण्यास अवघड असे हे मौलिक संदर्भ साहित्य मुक्तस्रोतात  उपलब्ध झाल्याने चिरंतन झाले आहे. त्यातील प्रत्येक शब्द आता सर्चेबल झाल्याने ग्रंथातील अनेक लपलेल्या किंवा दुर्लक्षित जागांच्या संदर्भात संशोधन , अभ्यास होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.  १८३२ ते १९०० या काळातल्या डिजिटाइश झालेल्या साहित्यात ‘देशी हुन्नर’ , ‘विधवा विवाह’, ‘भारतीय ज्योतिःशास्त्र’ , ‘प्रमाणशास्त्र’ , ‘केरळ कोकीळ’ या ग्रंथांचा समावेश आहे.

प्रथम स्कॅनिंग ते ओसीआर प्रक्रिया पूर्ण करून  मुक्तस्रोत   माहिती जालावर उपलब्ध करून देताना सर्वांना ती सहज शोधनपद्धती सोपी करण्यात आली आहे. ही सर्व दुर्मिळ ग्रंथसंपदा विकिमीडिया कॉमन्सवर सार्वजनिक वाचनालय राजगुरुनगर असा शोध घेतल्यास उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

एकीकडे कोरोनासारखे संकट असताना पुण्यापासून ४५ किलोमीटरवरच्या राजगुरुनगरचा हा अमूल्य ठेवा आता सातासमुद्रापार राहूनही एका क्लिकवर मिळू शकणार आहे. मौखिक ते लिखित परंपरेत आता डिजिटल रूपांतरामुळं येणाऱ्या पिढ्यांनाही हे ज्ञान उपलब्ध होऊ शकणार आहे. त्याबरोबरच आपले पूर्वजही पाश्चात्त्यांपेक्षा ज्ञानार्जनात, त्याच्या उपयोजनातही उणे नव्हते, हे समजायलाही मदत होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER