बलात्कार : राकाँचे नेते मेहबूब शेख यांना नीलम गोऱ्हे यांचा दणका; तपास वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्याची मागणी

Neelam Gorhe-Mehboob Sheikh

औरंगाबाद :- बलात्काराचे आरोप असलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादीची फौज मैदानात उतरली आहे. मात्र, या प्रकरणात ‘बी समरी रिपोर्ट’ची शक्यता लक्षात घेऊन याचा तपास महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवावा, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केली आहे. राज्यात शिवसेना राष्ट्रवादीसोबत सत्तेत आहे.  यामुळे हे प्रकरण उत्कंठावर्धक झाले आहे. गोऱ्हे यांनी आरोप केला आहे की, या अत्याचाराच्या प्रकरणात पोलीस ‘बी समरी फाईल’ करू शकतात. तसेच मेहबूब शेख (Mehboob Sheikh) हे तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांवर दबाव आणत आहेत.

प्रकरण

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरोधात सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप औरंगाबादमधील खाजगी शिकवणी घेणार्‍या २९ वर्षीय तरुणीने केला आहे. “माझ्यावर अत्याचार करणारा व्यक्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आहे. आता मला जे काही सांगायचे आहे ते कोर्टात सांगेन. ” असे तरुणीने म्हटले आहे. मेहबूब शेख यांनी त्यांच्यावरील बलात्काराचे आरोप फेटाळले होते.  त्यावर तरुणीने आपली बाजू मांडली आहे.

नीलम गोऱ्हेंचे पत्रक

या प्रकरणी नीलम गोऱ्हे यांनी हे पत्रक प्रसिद्ध केले आहे. नीलम गोर्‍हे म्हणतात की, “औरंगाबादमध्ये एका पक्षाच्या कार्यकर्त्याने नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याची घटना मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे. यात आरोपी म्हणतो तो मी नव्हेच! याशिवाय पीडित मुलीवर आणि कुटुंबावर दबाव आणत आहे. त्यामुळे पूर्वीच्या केसेसप्रमाणे या केसमध्येदेखील पोलिसांकडून बी समरी रिपोर्ट दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या घटनेचा तपास वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात यावा. तसेच औरंगाबाद इथल्या महिलांवरील अत्याचाराच्या बऱ्याच केसेसमध्ये बी समरी रिपोर्ट करून त्या केसेस बंद करण्यात आल्या आहेत. ज्या प्रकरणात बी समरी रिपोर्ट करून बंद केल्या आहेत त्याचा आढावा घेण्याची सूचना गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी द्यावी.”

डीसीपी दीपक गिर्हे यांना बडतर्फ करा : चित्रा वाघ

भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण केला आहे. या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन डीसीपींना बडतर्फ करण्याची मागणी केली. “पोलिसांनी अशा घटनेमध्ये माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया द्यायला नको होती. डीसीपी दीपक गिर्हे यांनी पीडित आणि आरोपी यांच्यामध्ये गेल्या वर्षभरात फोनवरून संभाषण झालं नाही अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली. परिणामी पीडितेचे मनोबल खच्चीकरण झाले. त्यामुळे संबंधित डीसीपींना बडतर्फ करा. ” अशी मागणी त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER