एड्सग्रस्ताने केलेला बलात्कार हा खुनाचा प्रयत्न नव्हे

  • दिल्ली हाय कोर्टाने केलेले महत्त्वपूर्ण विवेचन

Ajit Gogate‘एड्स’ (AIDS) या प्राणघातक रोगाने ग्रस्त असलेल्या पुरुषाने एखाद्या निरोगी स्त्रीवर बलात्कार केल्यास त्याने खुनाचा प्रयत्न करणे (Attempt to Murder) हा गुन्हाही  केल्याचे सरधोपटपणे मानता येते का, असा एक नवा मुद्दा एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयापुढे (Delhi High Court) अलीकडेच उपस्थित झाला. न्यायालयाने याचे उत्तर ठामपणे ‘नाही’ असे दिले आहे. न्या. विभू बाखरू यांनी या संदर्भात दिलेल्या निकालपत्रात कायद्याचे महत्त्वपूर्ण आणि तर्कसंगत विवेचन केले असून ते मुळातून वाचण्यासारखे आहे. कायद्याचा या मुद्द्यावर दिलेला हा बहुधा पहिलाच  निकाल आहे.

सभाजित मौर्य या इसमावर त्याच्या सावत्र मुलीवर वारंवार बलात्कार करणे व सक्तीने औषध देऊन तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न करणे या आरोपांवरून खटला दाखल करण्यात आला होता. मौर्य  एड्सग्रस्त आहे. अभियोग पक्षाने आरोपपत्र दाखल करताना खटल्यासाठी बलात्कार व सक्तीने गर्भपात या दोनच गुन्ह्यांसाठी (भादंवि कलम ३७६ व ३१३) खटला चालविण्याचा प्रस्ताव केला होता. सत्र न्यायालयाने खटल्यासाठी आरोप निश्चित करताना याखेरीज खुनाचा प्रयत्न करण्याचा (भादंवि कलम ३०७) आरोप स्वत:हून ठेवला. साक्षी-पुरावे पूर्ण झाल्यावर निकाल देताना सत्र न्यायालयाने सभाजितला या तिन्ही गुन्ह्यांसाठी दोषी ठरवून एकूण २५ वर्षांचा कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली. कलम ३०७ अन्वये शिक्षा देताना सत्र न्यायालयाने अशी कारणमीमांसा केली होती की, आरोपी एड्स आणि क्षयरोग या दोन संसर्गजन्य रोगांनी बाधित होता. स्वत:च्या रोगाचा संसर्ग जाणून-बुजून किंवा वाईट हेतूने दुसर्‍याला करण्याचे कृत्य भादंवि कलम २६९ व २७० अन्वये गुन्हा आहे. परंतु बलात्कारासारख्या कृतीने असा संसर्ग केला गेल्यास याहून अधिक कडक शिक्षेची दंडविधानात तरतूद नाही. आपल्या कृत्याने आपला संसर्ग पीडितेस होऊ शकतो व तो तसा झाला तर त्याने तिचा मृत्यूही होऊ शकतो, याची आरोपीस पूर्ण कल्पना होती. त्यामुळे या गोष्टीची जाणीव असूनही आरोपीने केलेला बलात्कार हा ‘खुनाचा प्रयत्न’ही ठरतो.

सत्र न्यायालयाची वैचारिक बैठक चुकीची ठरविताना न्या. बाखरू म्हणतात की, प्रचलित कायद्यात तरतूद नाही म्हणून आरोपीला अधिक कडक शिक्षा देता यावी यासाठी कलम ३०७ चा सरधोपटपणे आधार घेणे चुकीचे आहे. हीच कारणमीमांसा पुढे ताणली तर एड्सग्रस्त पुरुषाने, आपला संसर्ग उघड न करता एखाद्या स्त्रीशी तिच्या संमतीने केलेला शरीरसंबंधदेखील खुनाचा प्रयत्न म्हणावा लागेल. ज्याच्याशी संबंध येणार आहे तो संसर्गजन्य रोगाने ग्रस्त आहे याची माहिती नसताना शरीरसंबंधास दिलेली संमती कायद्याने अवैध ठरते. एवढेच नव्हे, अशा संमतीच्या शरीरसंबंधांतून संसर्घ होऊन त्या स्त्रीचे निधन झाले तर शरीरसंबंध करणार्‍या संसर्गग्रस्त पुरुषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यासाठीही दोषी धरावे लागेल. ही तर्कसंगती विकृत आहे.

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, रशिया, किरगिझीस्तान व अमेरिकेसह इतर देशांमधील कायद्यांचा आढावा घेऊन न्यायमूर्तींनी म्हटले की, बहुतांश देशांत ‘एचआयव्ही’चा संसर्ग करणे हा स्वतंत्र गुन्हा नाही. तेथे अशी प्रकरणे प्रचलित कायद्यांनुसारच हाताळली जातात. शरीरसंबंधातून एकाचा संसर्ग दुसऱ्यास झाल्यास फार तर तो शारीरिक इजा पोहचविण्याचा गुन्हा मानला जातो. संसर्गाचे कारण बलात्कार हे असेल तर त्याच गुन्ह्यासाठी शक्य तो जास्त कडक शिक्षा देण्याचा तो एक आधार मानला जातो.

न्यायालयाने पुढे म्हटले की, अशा प्रकरणांमध्ये खुनाचा प्रयत्न करणे हा गुन्हा सरधोपटपणे गृहीत धरणे चुकीचे आहे. कारण कलम ३०७ चा गुन्हा तेव्हाच घडल्याचे म्हटले जाऊ शकते जेव्हा संबंधित कृतीने बाधित व्यक्तीचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. पण एड्सच्या बाबतीत तसे म्हणता येत नाही. वैज्ञानिक संशोधन असे सांगते की, क्वचितप्रसंगी केल्या जाणाऱ्या  लैंगिक संबंधातून या रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता फारच कमी असते. जरी संसर्ग झाला तरी त्याने मृत्यू ओढवेलच याचीही निश्चिती नसते. त्यामुळे एड्सग्रस्ताने बलात्कार केला की पीडितेस त्याचा संसर्ग होईलच व त्याने तिचा मृत्यू होईलच असे खात्रीपूर्वक गृहीत धरून यास सरधोपटपणे ‘खुनाचा प्रयत्न’ मानता येणार नाही. थोडक्यात, अशा प्रकरणात आरोपीने मुद्दाम एड्सचा संसर्ग करण्याच्या हेतूने बलात्कार केला हे आधी ठामपणे सिद्ध व्हायला हवे. नंतर पीडितेस त्याच्यापासून प्रत्यक्ष संसर्ग व्हायला हवा व त्यातून तिला जीवावर बेतेल एवढे आजारपण यायला हवे.

हाती असलेल्या प्रकरणात तर आरोपीकडून पीडितेस असा संसर्ग झालेलाच नसल्याने गृहीतकांचा हा सर्व डोलारा रचून आरोपीस ‘खुनाच्या प्रयत्ना’साठी दोषी धरून शिक्षा देणे सर्वस्वी चुकीचे आहे, असेही न्या. बाखरू यांनी नमूद केले.

अजित गोगटे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER