
- मुंबईतील पोलीस हवालदाराची ‘सुरस’ कथा
मुंबई : बलात्काराचा आरोपी आणि जिच्या फिर्यादीवरून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदविला गेला ती स्त्री यांच्यातील बखेडा आता मिटला असून ती दोघं सुखाने ‘एकत्र’ राहात आहेत, याची खात्री पटल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) या आरोपीला आधी दिलेला तात्पुरता अंतरिम जामीन आता कायम केला आहे.
ही सुरस कथा मुंबई पोलीस दलातील मनोहर सहदेव शिंदे या ५२ वर्षंच्या पोलीस शिपायाची आहे. त्याचे आधी रीतसर लग्न झाले असून त्या पहिल्या बायकोपासून त्याला एक मुलगाही आहे. लग्न करण्याचे फसवे आश्वासन देऊन बलात्कार केल्याची फिर्याद एका सज्ञान मुलीने त्याच्याविरुद्ध १५ सप्टेंबर, २०१९ रोजी व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात केली. अटकेच्या भीतीने मनोहरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. न्या. भारती डांगरे यांनी २२ डिसेंबर रोजी त्यास अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. आता न्या. प्रकाश डी. नाईक यांनी तो जामीन कायम केला आहे.
हे दोन्ही आदेश देताना न्यायालयाने प्रामुख्याने पुढील चार बाबी विचारात घेतल्या:
१) आरोपी व फिर्यादी स्त्री यांच्यात सलोखा झाला असून ती दोघं आता सुखाने एकत्र राहात आहेत. २) आरोपी व फिर्यादी या दोघांनी ही गोष्ट शपथेवर न्यायालयात सांगितली आहे. ३)आरोपीविरुद्ध नोंविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी या दोघांनी मिळून उच्च न्यायालयात एकत्रित याचिका केली आहे आणि ४) आरोपीने त्याच्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट मिळविण्यासाठी कुटुंब न्यायालयात रीतसर अर्ज केला आहे.
या स्त्रीने हवालदार मनोहर विरुद्ध नोंदविलेल्या फिर्यादीनुसार तिची व मनोहरची सन २०१९ च्या सुरुवातीस फोनवर ओळख झाली. वर्षभराने जानेवारी २०२० मध्ये ती त्याला प्रत्यक्ष भेटली. आपण पहिल्या पत्नीला सोडले आहे व आपल्याला पुन्हा लग्न करायचे आहे, असे मनोहरने तिला सांगितले. त्यावेळी मनोहरने तिला आपले फोर्टमध्ये कॅमेरा आणि मोबाईलचे दुकान आहे, अशी थाप मारली होती.ओळख वाढत जाऊन ती पुढे मैत्री व शरीरसंबंध ठेवण्यापर्यंत गेली. नंतर प्रकाशने दिलेली माहिती खोटी आहे. त्याने पहिल्या पत्नीला सोडले नसून तो ती, मुलगा व आईसोबत राहतो हे कळल्यावर तिने मनोहरविरुद्ध बलात्कार व फसवणुकीची फिर्याद नोंदविली होती.
-अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला