बिचाऱ्या शिवसेनेवर संगतीचा परिणाम, भविष्यात मुस्लिमांचाही मेळावा घेतील; दानवेंचा टोमणा

Raosaheb Danve

मुंबई :-  शिवसेनेची (Shivsena) भूमिका परप्रांतीयांबाबत वेळोवेळी पुढे आलेली आहे. आता सत्तेत आल्यावर त्यांची भूमिका बदलल्याचे आपण बघत आहोत. भविष्यात ते मुस्लिम समाजाचादेखील मेळावा घेऊ शकतात. कारण बिचाऱ्या शिवसेनेची भूमिका बदलली. हा संगतीचा परिणाम आहे. कदाचित अन्य पक्षासोबत राहिल्यावर त्यांची भूमिका बदलली असेल, असा टोमणा भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेनेला लगावला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कामाला लागली आहे.

मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा गड मानला जातो. त्यामुळे यावेळी शिवसेनेने मुंबई राखण्यासाठी गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपडा’ अशी टॅगलाईन वापरली जात आहे. मात्र, या मेळाव्यावरून रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर टीका केली. औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या मुद्द्यावरूनदेखील रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला डिवचले. १९९५ साली भाजप आणि शिवसेनेच्या युतीचं सरकार असताना विधिमंडळात औरंगाबाद (Aurangabad) शहराचं नाव संभाजीनगर होईल, असा ठराव मंजूर करण्यात आला होता.

औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर व्हावं, अशी भाजपसोबत शिवसेनेचीदेखील तेव्हा स्पष्ट भूमिका होती. शिवसेनेने त्या भूमिकेपासून दूर जाऊ नये. संभाजीनगर नावाला आमचं समर्थन आहे. संभाजी महाराजांच्या नावाला काँग्रेस विरोध करत असेल तर आता शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आवाहन त्यांनी केलं. महाविकास आघाडी सरकारमधील घटक दलांनी एकत्र बसलं पाहिजे. तिन्ही पक्षांनी एकत्रित आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. काँग्रेसने जशी भूमिका स्पष्ट केली तशी शिवसेना आणि राष्ट्रवादीनेदेखील भूमिका स्पष्ट करावी.

भाजप काँग्रेसच्या भूमिकेविरोधात आहे. औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर म्हणून झालं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असं दानवे म्हणाले. पाच वर्षांत  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय केलं? असं म्हणण्यापेक्षा पाच वर्षं तुम्हीदेखील आमच्यासोबत सत्तेत सहभागी होतात ना? पाच वर्षांत  तुम्ही तरी नामांतराचा विषय काढला का? आता ते सर्व विसरले आहेत, असा घणाघात त्यांनी केला. निवडणुका हा नामांतराचा प्रश्न होऊ शकत नाही; पण ते जर निवडणुका डोळ्यासमोर घेऊन याबाबत भूमिका मांडत असतील तर ते चुकीचे आहे.

विकास आणि नामांतर या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. कोलकाता आणि बंगळुरूचं नाव बदललं. मद्रासचं नाव चेन्नई केलं. नाव बदललं म्हणून तिथला विकास थांबला नाही. विकासाची गाडी रुळावर राहू द्या. विकासाला आड आणू नका. नाव हा आमच्या आत्मसन्मानाचा भाग आहे. त्यामुळे ते बदललं पाहिजे, अशी भूमिका रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केली.

ही बातमी पण वाचा : त्या बाणेदार वचनाचे काय झाले? आशिष शेलारांचा शिवसेनेला सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER