मुख्यमंत्रिपदाचे न दिलेले आश्वासन आठवते, पण शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने विसरले; दानवेंचा उद्धव ठाकरेंना टोमणा

Raosaheb Danve & Uddhav Thackeray

औरंगाबाद : मुख्यमंत्रिपदाचे न दिलेले आश्वासन उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आहे; मात्र, शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन ते विसरले, असा टोमणा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मारला.

२८ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले – निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत असलेल्या प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा वेगळा होता. प्रत्येकाची आश्वासने वेगळी होती. निवडणुकीनंतर यांचे कृत्रिम सरकार आले. हे पक्ष एकत्र आले. आमचा मित्रपक्ष आम्हाला सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेला. मित्रपक्षाने जाताना सांगितले की, भाजपने मुख्यमंत्रिपदाचे आश्वासान दिले होते. हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात राहते, पण शेतकऱ्यांना मदत करण्यासंबंधी दिलेले आश्वासन लक्षात राहिले नाही. शिवसेनेने (Shiv Sena) बागायती शेतीसाठी ५० हजार तर कोरडवाहू शेतीसाठी २५ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. हे सगळे ते विसरले.

आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले नव्हते, हे दानवे यांनी पुन्हा ठासून सांगितले.

या सरकारची कामगिरी पूर्णपणे असमाधानकारक आहे. राज्यात महिलांवरील अत्याचारांत वाढ होत आहे. पनवेलमध्ये बलात्काराची घडना घडली. बुलडाणा, जळगाव, मंठा, मुंबई येथे महिलांची छेडछाड, बलात्काराच्या घटना घडल्या. वरील घटनांवरून सरकारचे महिलांबाबतचे धोरण उदासीन असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप त्यांनी केला.

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) केंद्राशी संबंध नाही. मराठा आरक्षण हा राज्याचा कायदा आहे. तरीही केंद्राकडे बोट दाखवले जात आहे, असे सांगून दानवे म्हणालेत, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार सुप्रीम कोर्टात सहकार्य करत नाही, असे अ‌ॅड. मुकुल रोहतगी यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER