शेतकरी आंदोलनामागे चीन, पाकिस्तानचा हात – रावसाहेब दानवे

Raosaheb Danve

जालना :- एएकीकडे दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप (BJP) नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी धक्कादायक विधान केलं आहे. शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा त्यांनी केला. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही, असंही ते म्हणाले.

या देशात आधी सीएए आणि एनआरसीमुळे उचकवण्यात आले. या कायद्यामुळे एक मुस्लिम तरी देशाबाहेर गेला का? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. हे आंदोलन बाहेरच्या देशाचं षडयंत्र असून आपल्या देशातील लोकांनी याचा विचार केला पाहिजे, असंही दानवे म्हणाले. आंदोलन करणारे लोक हे सुटाबुटातील लोक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे शेतकऱ्यांचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे कुणाच्या भूलथापांना बळी पडू नका, आपल्या देशातील शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, रावसाहेब दानवेंच्या विधानावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, भाजपाच्या नेत्यांना किती मस्ती आणि उन्माद आहे हे त्यांच्या विधानावरून दिसून येत आहे. दानवे स्वत: अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याचे मंत्री आहेत. त्यांनी जबाबदारीनं  बोलणं अपेक्षित आहे. दिल्लीत पाकिस्तान आणि चीनचे शेतकरी येऊन आंदोलन करतायत म्हणते यावरून भाजपाच्या शेतकऱ्यांसाठी काय भावना आहेत हे दिसून येतं.

हे निषेधार्ह आहे. भाजपाचे नेते सोडून या देशातील सगळी जनताच पाकिस्तानी आणि चिनी आहे का, असा संशय येऊ लागला आहे, असा टोला यावेळी त्यांनी लगावला आहे. दानवेंच्या वक्तव्यामुळे परिस्थिती बिघडू शकते अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तसंच पाकिस्तान आणि चीनचे शेतकरी आणि ५६ इंच छाती असणारे पंतप्रधान कुठे होते ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ही बातमी पण वाचा : दुर्देवाने कृषी कायदे घाईत मंजूर करण्यात आले, शरद पवार, राहुल गांधींचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER