रणवीर सिंहने पूर्ण केले सर्कसचे शूटिंग, ३१ डिसेंबर २०२१ ला होणार रिलीज

Maharashtra Today

‘सिंबा’नंतर दिग्दर्शक रोहित शेट्टीने (Rohit Shetty) रणवीर सिंहला (Ranveer Singh) घेऊन गेल्या वर्षी सर्कस सिनेमाला सुरुवात केली होती. ‘सिंबा’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाल्याने प्रेक्षकांच्या ‘सर्कस’कडून खूपच अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळेच सिनेमाच्या घोषणेपासूनच या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे सिनेमाचे शूटिंग पूर्ण होऊ शकले नव्हते. पण आता अनलॉक झाल्याबरोबर रोहित शेट्टी आणि रणवीर सिंहने प्रथम मुंबईत आणि नंतर हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीत सिनेमाचे शूटिंग केले. आता या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले असल्याचे समजते.

रणवीर सिंहसोबत या सिनेमात पूजा हेगडे, जॅकलीन फर्नाडीस, वरूण शर्मा, जॉनी लिव्हर, सिद्धार्थ जाधव, मुकेश तिवारीही दिसणार आहेत. रोहित शेट्टीचा हा सिनेमा शेक्सपियरच्या अत्यंत लोकप्रिय आणि चर्चित अशा द कॉमेडी ऑफ एरर्स (The Comedy of Errors) नाटकावर आधारित आहे. खरे तर या विषयावर बॉलिवूडमध्ये यापूर्वीही दोन सिनेमे तयार झालेले आहेत. १९६८ मध्ये किशोर कुमार (Kishore Kumar) अभिनीत ‘दो दूनी चार’ सिनेमा रिलीज झाला होता. त्यानंतर १९८२ मध्ये गुलझार (Guljar) यांनी अंगूर नावाने या विषयावर सिनेमा तयार केला होता. या सिनेमात संजीव कुमार (Sanjeev Kumar) आणि देवेन वर्मा (Deven Varma) यांनी दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. जुळा मालक आणि जुळ्या नोकरांची ही कथा प्रचंड विनोद निर्माण करणारी आहे. रोहित शेट्टीच्या सिनेमात रणवीर सिंह, संजीव कुमारची आणि वरूण शर्मा, देवेन वर्माची भूमिका साकारताना दिसणार आहे. रोहितने या सिनेमात विनोदाला अॅक्शनची जोडही दिलेली आहे.

सिनेमाचे शूटिंग आता पूर्ण झाले असून पोस्ट प्रॉडक्शनचे काम आता लवकरच हाती घेतले जाणार आहे. सिंबा वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज झाला होता आणि यशस्वी झाला होता म्हणून आता सर्कसही या वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ डिसेंबर २०२१ ला रिलीज करण्याची योजना आखण्यात आलेली आहे. मात्र रोहित शेट्टीकडून याबाबत अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button