रणजी क्रिकेटपटूंना भरपाई मिळावी- वसिम जाफरची मागणी

Ranji Trophy

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीचे (Ranji Trophy) सामने होणार नसल्याच्या निर्णयाचे पडसाद उमटू लागले आहे. रणजी स्पर्धेतील सर्वात यशस्वी फलंदाज वसिम जाफर (Wasim Jaffer) याने ही स्पर्धाच होणार नसल्याने रणजीपटूंना भरपाई मिळायला हवी अशी मागणी केली आहे. यासाठीची योजना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आखायला हवी असे त्याने म्हटले आहे.

कोरोनामुळे रणजी स्पर्धेसारख्या 38 संघांच्या आणि चार दिवसीय सामन्यांच्या स्पर्धेसाठी खबरदारी पाळणे अवघड असल्याने बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी 50 षटकांच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेचे सामने घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

आपले मत मांडताना जाफरने म्हटलेय की, 38 सघांच्या स्पर्धेसाठी खबरदारी घेणे तसे जरा कठीणच आहे. एवढे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्यात धोका होताच पण एक खेळाडू किंवा प्रशिक्षक म्हणून ही स्पर्धा व्हायला हवी होती असेच मला वाटते. जाफरने खेळाडू म्हणून गेल्या वर्षी निवृत्ती पत्करली असून तो सध्या उत्तराखंड संघाचा प्रशिक्षक आहे.

सैयद मुश्ताक अली ट्रॉफी व विजय हजारे ट्रॉफीचे सामने होत असल्याबद्दल त्याने समाधान व्यक्त केले. मात्र आर्थिकदृष्ट्या विचार केला तर रणजी स्पर्धेत खेळण्यासाठी खेळाडूंना अधिक पैसे मिळतात. ज्याला काही कामधंदा नाही आणि ज्याची उपजिविका क्रिकेटवरच आहे त्याला ही नुकसानदायक स्थिती आहे असे जाफरने म्हटले आहे.

गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे मंडळाची वार्षिक सभा झाली त्यात रणजी सामने किंवा हजारे ट्रॉफीचे सामने झाले नाही तर खेळाडूंना भरपाई देण्याचे संकेत मिळाले होते.

तसे झाले तर ती फार मोठी गोष्ट ठरेल. अजुनही बऱ्याच क्रिकेटपटूंना नोकऱ्या नाहीत. या तरुणांवर त्यांचे कुटुंब अवलंबून आहे. विजय हजारे ट्रॉफीसाठी 35 ते 40 हजार रुपये प्रत्येक सामन्याला मिळतात. ही रक्कम पूर्ण वर्षभरासाठी पुरेशी नाही. पुढचा सिझन आॕक्टोबरमध्ये सुरु होईल आणि सर्वांनाच आयपीएल खेळायला मिळेल असे नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी स्थिती फार अवघड आहे,,म्हणून बीसीसीआय त्यांना भरपाई देणार असेल तर त्याहुन चांगली गोष्ट नाही, असे जाफरने म्हटले आहे.

रणजी सामन्यांसाठी प्रत्येक खेळाडूला दीड लाख रुपये मिळतात.

रणजी स्पर्धा रद्द होण्याबद्दल त्याने म्हटलेय की, असे कित्तीतरी वर्षात घडलेले नाही. केवळ रणजी स्पर्धाच नाही तर युरौ व विम्बल्डनसारख्या स्पर्धासुध्दा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे. आमचा उत्तराखंडचा संघ एलीट ग्रुपच्या प्रयत्नात आहे आणि आम्ही रणजी स्पर्धा खेळलो तरच हे शक्य आहे. सैयद मुश्ताक अली स्पर्धा किंवा हजारे ट्रॉफीत चांगली कामगिरी केली तरी त्याचा आम्हाला रणजीसाठी उपयोग नाही. पुढल्या वर्षी नव्याने सुरुवात करावी लागणार आहे.

जर रणजी सामने झाले असते आणि ड गटात आमची कामगिरी चांगली झाली असती तर प्लैआॕफनंतर आम्ही क गटात पोहोचलो असतो. एलीट गटातील संघांचेही सामने कमी होतील कारण रणजी विजेता संघ नसेल आणि इराणी कप सामनासुध्दा होणार नाही. या गोष्टी खटकतीलच पण खेळाडूंची सुरक्षा व क्रिकेटच्या व्यस्त कार्यक्रमाचाही आम्हाला विचार करावा लागेल असे जाफरने म्हटले आहे.

रणजी सामने न होण्याचा फटका प्रशिक्षकांनासुध्दा बसणार आहे. काही भक्कम संघटनांनीच आधीपासून प्रशिक्षक नियुक्त केले आहेत आणि काही संघटनांनी स्पर्धा सुरु होण्याच्या 10 ते 15 दिवस आधीच प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफ नियुक्त केला आहे.यात खेळाडूंचे नुकसान आहे. सामने होणार नसलै तरी प्रशिक्षक असले तर ते खेळाडूंना प्रशिक्षण व सराव देऊ शकतात. पुढच्या वर्षासाठी तयारी करुन घेऊ शकतात पण बऱ्याच संघटनांनी असे केलेले नाही हे चुकीचे आहे असे जाफर यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER