रणजीतील यश भारतीय संघात स्थानासाठी पुरेसे नाही

रणजी मोसमातील यशस्वी खेळाडू संघाबाहेरच, मोजक्यांचीच होते प्रगती

Ranji Trophy

नागपूर :- रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा ही भारताची देशांतर्गत अव्वल स्पर्धा मानली जाते. म्हणजे रणजी स्पर्धेतील कामगिरी खेळाडूंसाठी भारतीय संघाचे दरवाजे खुले करणारी ठरावी असे अपेक्षित आहे परंतु असे होते का? पूर्वी असेच व्हायचे पण अलीकडे असे होतेय का? तर नाही, असेच या प्रश्नाचे उत्तर मिळते. रणजी स्पर्धेतील कामगिरी तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीच्या विविध भारतीय संघात स्थान (टीम इंडिया, भारत ‘अ’, भारत युवा) मिळवून देईल याची हमी देता येत नाही.

यंदाचे उदाहरण ताजे आहे. यंदाच्या रणजी मोसमातील सर्वात यशस्वी १० फलंदाज व गोलंदाजांपैकी बंगालचा अभिमन्यू ईश्वरन (८६१ धावा) आणि गुजरातचा प्रियांक पांचाल (८९८ धावा) वगळता इतर कुणालाच भारत ‘अ’ संघात स्थान मिळू शकलेले नाही. अगदी रणजी विजेत्या विदर्भाचा कर्णधार फैझ फझल आणि त्यांच्या फलंदाजीचा मुख्य कणा असलेल्या दिग्गज वसिम जाफरलासुध्दा स्थान मिळालेले नाही. रणजी अंतिम सामन्याच्या शेवटच्या दिवशी हा भारत ‘अ’ संघ जाहीर करण्यात आला जो १३ फेब्रुवारीपासून इंग्लंड लायन्सविरुध्द सामना खेळणार आहे.

वास्तविक भारत ‘अ’ संघाची निवड ही भविष्यात मुख्य भारतीय संघातील स्थान मिळवू शकतील अशा खेळाडूंना हेरण्याच्या दृष्टीने निवडण्यात येतो परंतु त्यादृष्टीने रणजी स्पर्धेतील कामगिरीकडे बघितले जात नसल्याचे दिसून येत आहे.

यंदाच्या रणजी मोसमात सिक्किमचा मिलिंदकुमार (१३३१ धावा), विदर्भाचा वसिम जाफर (१०३७ धावा), उत्तर प्रदेशचा आर.के.सिंग (९५३ धावा), गुजरातचा प्रियांक पांचाल (८९८), मेघालयचा पी. बिश्त (८९२) हे सर्वात यशस्वी पाच फलंदाज राहिले. गोलंदाजांमध्ये बिहारचा आशुतोष अमन (६८ बळी), सौराष्ट्राचा डी.ए.जडेजा (५९ बळी), विदर्भाचा आदित्य सरवटे (५५ बळी), मेघालयचा गुरिंदरसिंग (५३), उत्तरप्रदेशचा सौरव कुमार, राजस्थानचा टी.एम.उल हक व सिक्किमचा आय.एच.चौधरी (प्रत्येकी ५१ बळी) हे सर्वात यशस्वी पाच गोलंदाज राहिले. यंदाच्या टॉप १० फलंदाज व गोलंदाजांपैकी निम्मे हे तळाकडील म्हणजे प्लेट डिव्हिजनमधील संघांचे खेळाडू आहेत. साधारणपणे प्लेट डिव्हिजनचे संघ हे तुलनेने कमी दर्जाचे व कमकुवत समजले जातात म्हणून त्यांच्या खेळाडूंची कामगिरी किंवा त्यांच्याशी झालेल्या सामन्यांतील कामगिरी फारशी गांभिर्याने घेतली जात नाही तर वसिम जाफरसारखे आघाडीच्या संघांचे खेळाडू सफल होऊनही वयामुळे बाजूला पडतात.

आघाडीच्या संघांच्या खेळाडूंना प्राधान्य देणे यात चूकीचे काहीच नाही परंतु याबाबतीतही सातत्य नाही.२०१७-१८ च्या रणजी मोसमाचा अभ्यास केल्यास हे दिसून येईल. त्या मोसमातील आघाडीच्या फलंदाजांपैकी मयंक अगरवाल आणि हनुमा विहारी हे भारताच्या संघात पोहचले. दिल्लीचा नवदीप सैनी ३४ बळीच्या कामगिरीसह अफगणिस्तानविरुध्दच्या कसोटीसाठी भारतीय संघात स्थान मिळवता झाला पण प्रत्यक्ष सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. कर्नाटकचा के. गौतम व केरळचा जलज सक्सेना भारत ‘अ’ संघात पोहचले मात्र सौराष्ट्राचा धर्मेंद्रसिंह जडेजा (३४ व ५९ बळी), विदर्भाचा आदित्य सरवटे (२९ व ५५ बळी) हे सलग दोन मोसमात चमकूनही तसे नशिबवान ठरले नाहीत. लागोपाठ दोन वर्ष विदर्भाला रणजी विजेता बनविणारा कर्णधार फैझ फझल हासुध्दा ९१२ व ७५२ धावा करुन संघाबाहेरच आहे. त्यामुळे रणजी स्पर्धेतील यश तुम्हाला आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवून देईलच याची खात्री देत नाही.