‘माढा, शरद पवारांना पाडा’… रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी केला गौप्यस्फोट

Sharad Pawar,Madha ,Ranjeet Singh Naik-Nimbalkar

सोलापूर: लोकसभा निवडणुकांचा पडघम वाजला आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमधली असंतोषता बाहेर येऊ लागली. निवडणुकीच्या संवेदनशील काळात नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकजुटीनं राहून पक्ष संघटनेसाठी काम कतरायचं असतं नेमकं त्याच वेळी राष्ट्रवादीत अंतर्गत वाद, फोडाफोडीचं राजकारण, गटबाजी पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवरचा राग पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मोठ्या संयमाने आणि चाणक्य नीतीचा उपयोग करून व्यक्त केला.

त्याला साथ देण्यात सोशल मीडियाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.लोकसभा निवडणुकीच्या अगोदर ‘माढा, शरद पवारांना पाडा’ अशी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करण्यात आली होती.  ही पोस्ट  शेअर करण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचेच उमेदवार संजय शिंदे यांचाही समावेश होता, असा गौप्यस्फोट भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला आहे. लोकसभा निवडणूक  प्रचारादरम्यान माढ्याचे  माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. मोहिते पाटील गट आक्रमक झाला होता. मोहिते पाटलांच्या मुलाच्या भाजपप्रवेशानंतर शरद पवार – मोहिते पाटील वादाला चांगलाच रंग चढला होता. त्याच दरम्यान सोशल मीडियावर ‘ माढा, शरद पवारांना पाडा’ अशा आशयाची पोस्ट व्हायरल झाली होती.

याबद्दल निकालानंतर भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गौप्यस्फोट केला. लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून आघाडी घेतल्याचे समजताच रणजिसिंह नाईक सोलापुरात आले. भाजप कार्यकर्त्यांसह जल्लोष करून ते रामवाडी गोदाम येथील मतमोजणी केंद्राला भेट देण्यासाठी गेले. मीडिया कक्षात संवाद साधताना त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीअगोदर व्हायरल झालेल्या त्या पोस्टचा उल्लेख केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे माढा मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते.

त्यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधून भूमिका ठरविण्यासाठी ते माढ्याच्या दौऱ्यावर येण्याआधी सोशल मीडियावर ‘माढा, शरद पवार यांना पाडा’ अशी पोस्ट व्हायरल करण्यात आली. या पोस्टचा धसका घेऊन पवार यांनी माघार घेतली; पण ही पोस्ट व्हायरल करणारांमध्ये संजय शिंदे हे सामील होते, असा आरोप नाईक यांनी केला. ही पोस्ट तयार करताना शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली होती. आता लोकसभा निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी संजय शिंदे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून हटविण्यात येईल.मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. शिंदे यांची झेडपीची तर विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांची खुर्ची रिकामी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा नाईक-निंबाळकर यांनी यावेळी दिला. यावेळी त्यांच्यासमवेत धैर्यशील मोहिते-पाटील आदी उपस्थित होते. अशी माहिती माढ्याचे  भाजपचे नवनिर्वाचित खासदार नाईक निंबाळकरांनी दिली.