फॅन्ससोबत वाढदिवस साजरा करणार राणी मुखर्जी

Maharashtra Today

पडद्यापासून लांब असलेल्या कलाकारांना आता फॅन्ससोबत संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचाच आधार आहे. फॅन्सशी संवाद साधून आपण अजूनही बॉलिवूडच्या रेसमध्ये आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न काही कलाकार करीत असतात. ऐन बहराच्या काळात फॅन्सकडे ढुंकूनही न पाहाणारे कलाकारही आता फॅन्स म्हणजेच आमचे सबकुछ बोलताना दिसत आहेत. राणी मुखर्जीही अशाच कलाकारांपैकी एक आहे. अमजद खानचा मुलगा शादाब खानसोबत नायिका म्हणून १९९७ मध्ये काजोलची चुलत बहिण असलेल्या राणी मुखर्जीने (Rani Mukerji) राजा की आएगी बारात (Raja Ki Aayegi Baraat) सिनेमातून रुपेरी पडद्यावर आली होती. या सिनेमानंतर तिने लवकरच मेन स्ट्रीमध्ये प्रवेश केला आणि मोठ्या नायकांसोबत काम करीत आघाडीच्या नायिकांमध्ये स्थान मिळवले होते.

यश चोप्रांचा मुलगा आदित्य चोप्रासोबत राणीने लग्न केले आणि ती संसाराला लागली. आदित्यचे राणीसोबत दुसरे लग्न होते. नवरा निर्माता असल्याने त्याने तिच्यासाठी काही सिनेमांची निर्मितीही केली. याच राणीचा उद्या म्हणजे २१ मार्च रोजी वाढदिवस आहे. राणीचा जन्म २१ मार्च १९७८ ला मुंबईत झाला होता. गेली अनेक वर्ष फॅन्सपासून लांब असलेल्या राणी मुखर्जीने फॅन्ससोबत वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले आहे. याची माहिती देण्यासाठी यशराज फिल्म्सच्या सोशल मिडिया अकाउंटवर एक पोस्ट टाकण्यात आली आहे. खरे तर राणी मुखर्जी सोशल मीडियापासून आजवर दूरच राहिली आहे. ती कधीही तिच्याबाबतची कोणतीही गोष्ट सोशल मीडियावर शेअर करीत नाही. यावेळी प्रथमच ती सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी संपर्क करणार आहे.

यशराज फिल्मसने सोशल मीडियावर टाकलेल्या या पोस्टमध्ये राणी मुखर्जी एका लाल रंगाच्या कारमध्ये बसलेली दिसत आहे. तसेच ती आज संध्याकाळी ४ वाजता फॅन्ससोबत संवाद साधणार असल्याचेही म्हटले आहे. याबाबत माहिती देताना राणी मुखर्जीने म्हटले आहे, ‘खरे तर मी सोशल मीडियावर नाही. परंतु माझ्या फॅन्ससोबत मी वेळ घालवू इच्छिते. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ते माझी ताकद आहेत. त्यामुळेच या वार्षिक सोशल मीडिया इंटरअॅक्शनच्या माध्यमातून मी त्यांच्याशी जोडली जाणार आहे. मी माझा वाढदिवस माझ्या कुटुंबियांसोबत साजरा करण्यापूर्वी माझ्या प्रशंसकांशी बोलण्याची संधी मिळणार असल्याने मी खूप आनंदित आहे. प्रशंसकांचे प्रेम आणि सहकार्यामुळेच मी चांगले काम करू शकले. त्यांनी माझ्या सिनेमांना डोक्यावर घेतले नसते तर आज मी इथवर पोहोचली नसते. त्यांचे आभार मानण्याचा हा एक प्रयत्न आहे.’

एकूणच आता राणीला तिच्या फॅन्सची आठवण आली आहे. तिचा नवा सिनेमा रिलीज होणार असल्याने तर तिला फॅन्सची आठवण होत असल्याचे बॉलिवूडमध्ये म्हटले जाऊ लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER