नाटकासाठी धावले रंगकर्मी

Natak

तिसरी घंटा वाजली आहे. नाट्यगृहाचा पडदा उघडला आहे. लवकरच प्रयोग सुरू असे लिहिलेले बोर्ड आता नाट्यगृहाबाहेर लावले जात आहेत. इतकेच नव्हे तर नाटकाला प्रेक्षकांनी यावे यासाठी कलाकारांनी प्रेक्षकांना आवाहन करायला सुरुवात केली आहे. कोरोनाची साथ आवाक्यात आल्यानंतर लॉकडाउन अनलॉक झाले आणि ह्या संकल्पनेवर ‘नाटक अनलॉक’ ही मोहीम रंगकर्मींनी हातात घेतली आहे. ‘प्रेक्षकहो नाटकाला या, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळी काळजी घेऊन या…’ नाटकाचा आनंददेखील लुटा असे सांगण्यासाठी अनेक रंगकर्मी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एकत्र आले आहेत.

प्रेक्षकांना नाट्यगृहापर्यंत येण्याचा विश्वास देण्यासाठी दस्तुरखुद्द रंगकर्मींनी दिलेली हाक अर्थातच प्रेक्षकांच्यादेखील कानापर्यंत पोहोचत आहे .जवळपास आठ महिने नाट्यगृहातील तिसरी घंटा बंद होती. नाटकाचे दौरे थांबले होते. प्रयोग पडद्याच्या आत शांत होते . मात्र आता नाट्यगृह सुरू करण्यासाठी हिरवा कंदील मिळाल्यामुळे नाट्यवर्तुळात चैतन्याचे वारे वाहू लागले आहेत.

१५ दिवसांपासूनच नाटकाचे प्रयोग लावण्यात आले आहेत. एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा प्रयोग जाहीर केल्यानंतर दोन दिवसातच हाऊसफुल्लचा बोर्डदेखील लागला होता. अर्थात नाट्यगृहातील एकूण क्षमतेपेक्षा पन्नास टक्केच प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे, त्यामुळे जरी सगळ्या खुर्च्या भरलेल्या नसल्या तरीही नाट्यगृह फुल्ल होणार आहेत. मात्र अजूनही लोकांच्या मनात नाट्यगृहापर्यंत येण्याची धास्ती आहे आणि त्यासाठी अजूनही ते वातावरण निवळलेले नाही. पण थोडी काळजी घेतली तर नाटकाचे प्रयोग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही तयार आहोत असं सांगत नाटकातील काही कलाकारच त्यांच्या सोशल मीडिया पेजवर एका वेगळ्या माध्यमातून एकत्र आले आहेत.

नाटक अनलॉक ही वेगळी संकल्पना सध्या ऑनलाईन वर्तुळात चर्चेत आहे. या बाबतचे व्हिडिओ आणि फोटो तुफान व्हायरलदेखील होत आहेत. अभिनेते प्रशांत दामले ,कविता -लाड मेढेकर, उमेश कामत, भरत जाधव, ऋता दुर्गुळे या कलाकारांनी एकत्र येत प्रेक्षकांना नाटकाला या अशी साद घातली आहे. या अभिनव कल्पनेचे नाट्यवर्तुळातदेखील खूप कौतुक होत आहे. या ऑनलाईन मोहिमेमध्ये प्रेक्षकांना नाटकाला या असे सांगत असताना मास्क लावायला विसरू नका असे आवाहन उमेश कामत याने केले. खरेतर नाटकाला येणारा प्रेक्षक हा या दृष्टीने वेगळ्याच अभिरुचीचा असतो. त्यामुळे नाटक सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे आधीच तो नाट्यगृहापर्यंत पोहोचलेला असतो.

मात्र नेहमीच्या वेळेपेक्षा आता अजून अर्धा तास लवकर पोहोचा कारण नाट्यगृहात तुम्हाला प्रवेश देण्यापूर्वी तुमच्या शरीरातील तापमान मोजायचे आहे, तुम्हाला सॅनिटायझरने हात स्वच्छ करायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला नाट्यगृहात प्रवेश दिला जाणार आहे, असा सल्ला भरत जाधव याने या मोहिमेमधून सांगितला आहे .अभिनयातून रंगमंचावर खळखळून हसवणारे अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांच्या मिश्किल स्वभावाप्रमाणे मनसोक्त हसा पण हसताना मास्क काढू नका अशी प्रेमाची सूचनादेखील दिली आहे. खरं तर नाटक एकमेकांसोबत बघण्यात एक वेगळीच मजा असते. त्यामुळे नाटकातील एखाद्या विनोदी पंचवर आपल्या शेजारच्या मित्राला टाळी देत किंवा त्याच्या खांद्यावर मनसोक्त दिलखुलासपणे हसत नाटकातल्या विनोदावर हशा पिकवायला कुणाला आवडत नाही! पण आता मात्र दोन खुर्च्यांमध्ये एक खुर्ची रिकामी असणार आहे हेअंतर वियोगाचे असलं, तरी ते गरजेचे आहे असं सांगत आहे कविता लाड यांनी संवाद साधला आहे.

गेल्याच आठवड्यात एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाच्या प्रयोगाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर या नाटकातील मुख्य कलाकार प्रशांत दामले आणि कविता लाड यांनी स्वतः तिकीट खिडकीवर थांबून प्रेक्षकांशी संवाद साधला होता. प्रशांत आणि कविता यांचा हा प्रयोग नाटकासाठी खूपच यशस्वी ठरला होता. अजूनही नाट्यगृह सुरू झाल्यानंतर अद्याप प्रेक्षकांच्या मनात करोनामुळे साशंकता आहे हे जरी खरं असलं तरी कुठून तरी सुरुवात झाली पाहिजे आणि म्हणूनच समाजामध्ये सगळ्या गोष्टी अनलॉक होत असताना आता नाटकाचे दौरे, प्रयोग हे देखील अनलॉक व्हावे त्यासाठी नाटक अनलॉक ही अभिनव संकल्पना घेऊन हे सगळे कलाकार रंगकर्मी प्रेक्षकांची एका वेगळ्याच माध्यमातून संवाद साधत आहेत .या सगळ्या रंगकर्मींच्या प्रेमपूर्वक आवाहनाला रसिकांनी देखील त्याच्या कमेंट मधून दाद दिल्याचे दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER