रानगवा मेला…आता हवी एसओपी

रानगवा मेला...आता हवी एसओपी

Shailendra Paranjapeतब्बल साडेसहा-सात तास माणसांशी झुंज देऊन एका रानगव्यानं बुधवारी मध्यान्हीच्या सुमारास प्राण सोडले. वास्तविक तृणभक्षी म्हणजे गवतावर गुजराण करणाऱ्या या महाकाय भीतीदायक प्राण्याची चूक काय तर माणसाच्या नादी लागला. मागच्या पिढीतील मराठी चित्रपट निर्माते दिग्दर्शक अभिनेते दादा कोंडके (Dada Kondke) यांच्या एका चित्रपटात गाणं होतं, मानसापरास मेंढरं बरी…

या गाण्याची आठवण व्हावी, अशाच प्रकारचं वर्तन सुविद्य पुणेकरांनी दाखवलं आणि चुकून मानवी वस्तीत दाखल झालेल्या रानगव्याला अक्षरशः वेडं करून पळवून दमवून मारून टाकलं. सर्कस या प्रकारातूनही हल्ली प्राणी हद्दपार होऊ लागलेत आणि प्राणीप्रेमी नेत्या मनेका गांधी तसंच अन्य प्राणीप्रेमींमुळं प्राण्यांवर होणारे अत्याचार काही प्रमाणात कमी झालेत. पण रानगव्याचा मानवी वस्तीतला प्रवेश, त्यातून उडालेला हलकल्लोळ आणि त्याची परिणती रानगव्याच्या मृत्यूत होण्याच्या घटनेनं अनेक धडे माणसाला दिले आहेत.

माणसं आणि प्राणीसृष्टी यांचं सहजीवन पूर्वी होतं. वास्तविक, प्राणीसृष्टीतही (मानव वगळता) सगळेच प्राणी नैसर्गिक नियमांच्या विरोधात जाताना क्वचितच दिसतात. म्हणजे वाघ सरपटताना किंवा साप वाघासारखा झेप घेताना दिसत नाही. माणूस मात्र मेंढरांसारखा वागू शकतो आणि त्यात सोशल मिडियावर, व्हाट्स अपवर, फेसबुकवर काही तरी वेगळंच टाकण्याची संधी असेल तर…खूप खूप लाइक्स मिळण्यासारखा व्हिडियो फोटो मिळत असेल तर….

तर काय बघायलाच नको. नेमकं तेच रानगव्याचं झालं. पुण्याबाहेरच्या ग्रामीण भागातून हा रानगवा पुणे शहरात पश्चिम टोकाला असलेल्या महामार्गालगतच्या महात्मा सोसायटीत दाखल झाला. वास्तविक रानगवा रात्री फिरणारा निशाचर प्राणी. पहाटे पहाटे लोक जागे होण्यापूर्वी त्याला आपण काय घोडचूक करून बसलोय, याची कल्पनाच नसणार. पण सकाळचा फेरफटका मारायला बाहेर पडलेल्या काहींना तो दृष्टीस पडला.

आजकाल छोटीशी गोष्टही व्हायरल होते आणि ही तर महाकाय रानगव्याची गोष्ट. मग काय विचारता, बघता बघता गर्दी जमू लागली आणि फोटो व्हिडियो व्हायरल होत लोकांनी गर्दी करत रानगव्याला बिथरवून टाकले. वन विभागाचे लोक पोलीस घटनास्थळी आले पण बघ्यांच्या गर्दीचं काय करणार…त्यात पुणेरी माणूस भलताच स्वातंत्र्यप्रेमी. अशा घटनेचं चित्रण करायचा आणि ते सोशल मिडियावर टाकायचा आमचा हक्कच आहे, असं म्हणून आपला आततायीपणा सार्वजनिक करू पाहणारे.

सोशल मिडियाचा वापर करून चांगल्या गोष्टी पसरल्या तर हरकत नाही. पण रानगव्याचं चित्र किंवा तो वस्तीत शिरल्याची बातमी व्हायरल करून, त्याचं लाइव्ह प्रसारण करून या भागातली गर्दी वाढायला आपण कारणीभूत ठरलो आहोत, याचं भान त्यात सहभागी असलेल्या सर्वांनीच ठेवायला हवं.

प्राणीमित्र तसंच त्या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ, वन विभागातले लोक हे सारे हेच सांगताहेत की रानगवा गर्दी जमल्याने बिथरला आणि बिथरल्यामुळे पळत सुटला. पळून पळून तो दमला आणि अखेर जेरबंद केल्यानंतर खूप ताण आल्यानं त्यानं प्राण सोडला.

करोनानंतरच्या काळात विविध क्षेत्रं खुली करताना तयार केलेली स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर किंवा एसओपी रानगव्यांनी मानवी वस्तीत येण्यासाठी करता येणं शक्यही नाही. पण रानगवा असो किंवा अन्य प्राणी, तो मानवी वस्तीत आला तर वागावं कसं याची एसओपी या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी तयार करावी. सरकारचे प्रमुख वन्यसृष्टीचं प्रेम असलेलेच आहेत. त्यांच्याशी चर्चा करावी आणि वन्यप्राण्यांसाठी नाही तरी किमान त्यांचा जीव घ्यायला कारणीभूत ठरणाऱ्या माणसांसाठी एखादी एसओपी तयार करावी. तसं झालं तर या निशाचर रानगव्याचा देह कारणी लागेल.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer :-  ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER