पक्ष स्थापण करताच राणेंना एनडीए कडून आमंत्रण

मुंबई : काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत काही वेळेपूर्वीच नव्या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असे पक्षाचे नावजाहीर केले. पक्ष स्थापनेला एक तास होत नाही तोच राणेंना एनडीएकडून आमंत्रण मिळालं असून, नारायण राणे यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रणही स्वीकारलं आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

एनडीएमध्ये सहभागी होण्याबाबत नारायण राणे यांच्या औपचारिक घोषणेकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र राणे औपचारिक घोषणा कधी करतात, हे त्यांच्याकडचं कळणार आहे. शिवाय, आगामी राज्य मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांचा समावेश होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील आगामी हालचाली महत्त्वाच्या असणार आहेत.

नारायण राणे यांचा नवीन पक्ष भाजपाला पाठिंबा जाहीर करणार असून, मोबदल्यात त्यांना मंत्रिपदाची धुरा देण्यात येईल अशी माहिती नारायण राणे यांच्या निकटच्या सूत्रांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. शिवसेना विशेषकरुन उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीत राणे बसत असल्याने त्यांना मंत्रिपद देण्यात येऊ शकते. राणे यांना महत्वपूर्ण समजल्या महसूल विभागाची धुरा सोपविण्याचा विचार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहे. नारायण राणेंची आक्रमकता, महत्वकांक्षा लक्षात घेता त्यांना थेट पक्षात प्रवेश देण्याऐवजी एनडीएच्या माध्यमातून सोबत ठेवण्याची भाजपाची भूमिका होती.

नारायण राणे सडेतोड, स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी स्वपक्षातील नेत्यांवरही अऩेकदा टीका करत त्यांना कोंडीत धरलं होत. त्यांचा हाच आक्रमक स्वभाव भाजपाला अडचणीत आणू शकतो. त्यामुळे त्यांना थेट पक्षात प्रवेश देण्यास भाजप नेतृत्व अनुकूल नव्हता. भाजपाने राणेंना नवा पक्ष स्थापन करून एनडीएमध्ये सहभागी करण्याची तयारी केली आहे.