रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ आता पुढील वर्षी रिलीज होणार

Maharashtra Today

फॉक्स स्टार (Fox Star) आणि करण जोहर (Karan Johar) निर्मित, अयान मुखर्जी (Ayan Mukerji) दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाची घोषणा २०१८ मध्ये सर्वप्रथम करण्यात आली होती. घोषणेपासूनच सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. तीन भागात रिलीज होणाऱ्या या भव्य आणि खर्चिक सिनेमाचा पहिला भाग गेल्या वर्षी रिलीज स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर रिलीज केला जाणार होता. पण कोरोनाने सगळ्यांनाच घरी बसवल्याने सिनेमाचे शूटिंग काही झाले नाही त्यामुळे सिनेमाही रिलीज झाला नाही. यावर्षी दिवाळीत हा सिनेमा रिलीज करण्याची योजना करण जोहर आणि फॉक्स स्टारने आखली होती. पण दिवाळीला अनेक मोठ्या सिनेमांनी थिएटर अगोदरच बुक केल्याने ‘ब्रह्मास्त्र’ला मोठ्या प्रमाणावर थिएटर मिळणे कठिण दिसत आहे. त्यामुळेच हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजे २०२२ च्या मार्च किंवा एप्रिलमध्ये रिलीज करण्याचा निर्मात्यांचा विचार असल्याचे म्हटले जात आहे.

‘ब्रह्मास्त्र’मध्ये सध्या एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) काम करीत असून हे दोघे प्रथमच एकत्र दिसणार आहेत. त्यामुळेही या सिनेमाची प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. फॉक्स स्टारने हिंदी सिने निर्मिती न करण्याचा निर्णय घेऊन हातातील काही प्रोजेक्ट बंद केले. पण ब्रह्मास्त्रच्या तिन्ही भागांची निर्मिती करण्यासाठी मात्र ते तयार आहेत. एवढेच नव्हे तर या सिनेमाच्या निर्मितीत रणबीर कपूरनेही हातभार लावलेला आहे. यापूर्वी त्याने जग्गा जासूसच्या निर्मितीतही भाग घेतला होता. या सिनेमात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ब्रह्मदेवाची तर साऊथ स्टार नागार्जुन (Nagarjuna Akkineni) विष्णूच्या भूमिकेत दिसणार आहेत. शाहरुख खानही (Shahrukh Khan) पाहुणा कलाकार म्हणून सिनेमात दिसणार आहे. ३ डी आणि आयमॅक्समध्ये तीन भागात हा सिनेमा तयार केला जात आहे. गेल्या वर्षी सिनेमा रिलीज होऊ न शकल्याने यावर्षी हा सिनेमा रिलीज केला जाणार होता.

यावर्षी सुरुवातीला मे महिन्यात रिलीज करण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र मे महिन्यात काही मोठे सिनेमे रिलीज होणार असल्याने प्रथम दिवाळी आणि नंतर नाताळच्या सुट्टीमध्ये सिनेमा रिलीज करण्याची योजना आखण्यात आली. पण सगळ्या तारखा आणि थिएटर्स मोठ्या निर्मात्यांनी बुक केल्याने ‘ब्रह्मास्त्र’ला मोठ्या प्रमाणावर थिएटर मिळणे कठिण झाले आहे. अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘पृथ्वीराज’, शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) ‘जर्सी’, टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) ‘हीरोपंती 2’ आणि आमिर खान (Aamir Khan) करीना कपूरचा (Kareena Kapoor) ‘लाल सिंह चड्ढा’ असे काही मोठे सिनेमे या काळात रिलीज होणार आहेत. आता हा सिनेमा कधी रिलीज करायचा यावर फॉक्स स्टार, करण जोहर, अयान मुखर्जी आणि रणबीर कपूरमध्ये सतत बैठका होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा सिनेमा आता पुढील वर्षी मार्च, एप्रिलमध्ये रिलीज करण्याचे ठरवले जात आहे. करण जोहर लवकरच सिनेमाच्या रिलीजबाबत माहिती देणार असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER