रणबीर कपूर आणि संजय लीला भंसाळीला कोरोनाची लागण, आलिया निगेटिव्ह

Ranbir Kapoor - Alia Bhat - Sanjay Leela Bhanshali

कोरोना संसर्ग कमी होत असल्याचे दिसत असतानाच अचानक आता कोरोनाने पुन्हा नव्याने डोके वर काढले आहे. एकीकडे कोरोनाची लस घेण्यासाठी गर्दी होत असतानाच कोरोना (Corona) रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढू लागलेली आहे. बॉलिवूडमधील काही कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे मागे आम्ही तुम्हाला सांगितलेच होते. लॉकडाऊननंतर कोरोना संसर्ग होणार नाही याची काळजी घेऊन बॉलिवूडच्या निर्मात्यांनी शूटिंग सुरु केली. पण तरीही आता काही जणांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रख्यात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि निर्माता दिग्दर्शक संजय लीला भंसाळी (Sanjay Leela Bhansali) यांना कोरोनाची लागण झाली असल्याने त्यांच्या सिनेमाचे शूटिंग काही काळासाठी बंद ठेवावे लागणार आहे.

रणबीर कपूर आजारी असल्याची बातमी बॉलिवूडमध्ये (Bollywood) पसरली होती. रणबीरला कोरोना झाल्याचे म्हटले जात होते. याबाबत रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांच्याशी बोलणे झाले असता त्यांनी रणबीर आजारी आहे, पण त्याला कोरोना झाला आहे की नाही ते ठाऊक नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे रणबीरला नक्की काय झाले आहे असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण नंतर रणबीरच्या आईने नीतू सिंह (Neetu Singh) यांनी रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट केले. रणबीरच्या प्रकृतीबाबत पसरत असलेल्या बातम्या पाहून नीतू सिंह यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये त्या म्हणतात ‘रणबीरच्या प्रकृतीबाबत आपणास असलेल्या चिंतेबाबत आणि लवकर बरे होण्याच्या प्रार्थनेसाठी आभार, रणबीरची कोविड-19 टेस्ट पॉझिटिव्ह आली असून तो यावर औषध घेत आहे आणि त्याच्या प्रकृतीतही सुधार होत आहे.’ गेल्या वर्षी नीतू सिंह यांनाही कोरोनाची लागण झाली होती. रणबीर सध्या ‘ब्रह्मास्त्र’च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. पण आता तो होम क्वारंटाईन असल्याने ब्रह्मास्त्रचे शूटिंग काही दिवसांसाठी थांबवावे लागले आहे.

निर्माता दिग्दर्शक संजय लीला भंसाळीलाही कोरोनाची लागण झाली आहे. संजय भंसाळी सध्या होम क्वारंटाईन असल्याने त्याच्या ‘गंगूबाई काठियावाडी’चे शूटिंग थांबवण्यात आले आहे. मात्र सिनेमाच्या यूनिटमध्ये घबराट पसरली असून सगळ्या यूनिटने कोरोना चाचणी करवून घेण्याचे ठरवले आहे असे सांगितले जात आहे.

आलिया भट्ट (Alia Bhatt) मात्र वरचे वर तिची कोरोना चाचणी करीत असते. रणबीर आणि संजय लीला भंसाळीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर आलियाने पुन्हा कोरोना टेस्ट केली. तिची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी काळजी म्हणून तिने स्वतःला होम क्वारंटाईन केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER