रणबीरने ठरवली आलियासोबतच्या लग्नाची तारीख

बॉलिवुडमधील सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र असलेली सध्याचे प्रेमी युगल आहे रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt). गेल्या काही वर्षांपासून हे दोघे डेटिंग करीत आहे. गेल्या वर्षी रणबीरने 2020 मध्ये लग्न करणार असल्याचे सूतोवाच केले होते. लग्नाची तयारी सुरु केल्याचेही समजले होते. परंतु प्रथम कोरोना आणि नंतर वडिल ऋषी कपूर यांचे निधन झाल्याने हे लग्न होऊ शकले नव्हते. मात्र पुढील वर्षी रणबीर आणि आलिया लग्न करणार असल्याचे निश्चित झाले आहे. स्वतः रणबीर कपूरनेच एका मुलाखतीत पुढील वर्षी आलियासोबत लग्न करणार असून लग्नाची तारीखही नक्की झाल्याचे सांगितले आहे.

विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात आलिया भट्टला तिच्या लग्नाविषयी विचारले असता, तिने, सगळ्यांना माझ्या लग्नाची काळजी लागलेली आहे. पण मी फक्त 25 वर्षांची आहे आणि इतक्यातच लग्न करण्याचा माझा विचार नसल्याचे सांगितले होते. आलिया आणि रणबीर एकमेकांच्या प्रेमात असले आणि अनेक ठिकाणी एकत्र दिसत असले, दोघे एकत्र पिकनिकला जात असले, आलिया रणबीरच्या कौटुंबिक कार्यक्रमात भाग घेत असली तरी आम्ही दोघे चांगले मित्र आहोत असेच आलिया सांगत आली होती. रणबीरनेही कधीही त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली नव्हती. रणबीरने प्रथमच जाहीर कबुली दिली असली तरी आलियाने मात्र लग्नाचा इतक्यात विचार नसल्याचे सांगितल्याने खरे काय असा प्रश्न बॉलिवुडमध्ये विचारला जाऊ लागला आहे.

लॉकडाउनमध्ये वेळ कसा घालवला असा प्रश्न रणबीर कपूरला केला असता त्याने सांगितले, मी हा सगळा वेळ माझ्या कुटुंबियांसोबत घालवला. घरी असल्याने मी पुस्तके वाचत असे आणि दिवसाला दोन-तीन सिनेमेही बघत असे. त्याचवेळी आलियाने मात्र गिटार वाजवण्यापासून स्क्रीनराईटिंगपर्यंत अनेक ऑनलाइन क्लासेस केले. आलिया ही अचिव्हर असून मी तिच्या कितीतरी पाठीमागे आहे असेही रणबीर कपूर म्हणाला.

लग्नाबाबत रणबीरला विचारले असता, जर कोरोनाची लाट नसती तर एवढ्यात माझे लग्न झाले असते. परंतु मी लवकरात लवकर माझे हे लक्ष्य पूर्ण करू इच्छितो असे उत्तर त्याने दिले.

रणबीर आणि आलिया ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात प्रथमच एकत्र काम करीत असून यात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन यांचीही भूमिका आहे. या सिनेमाकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER