रामविलास पासवानजी यांच्या निधनाने एक मानवतावादी नेता गमावला : देवेंद्र फडणवीस

Fadnavis-Paswan

मुंबई :- केंद्रीय मंत्री श्री रामविलास पासवान यांच्या आकस्मिक निधनाने एक मानवतावादी नेता आपण गमावला आहे. गरिब आणि वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेला संघर्ष कायम स्मरणात राहील, अशी शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि बिहारचे भाजपा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या शोकसंवेदनेत देवेंद्र फडणवीस म्हणतात की, रामविलास पासवान यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. अनेक दशके त्यांनी जनतेच्या मनावर अधिराज्य केले. बिहारच्या विकासाला आणि राजकारणाला एक नवीन उंची त्यांनी प्रदान केली. सुमारे 9 वेळा त्यांनी संसदेत प्रतिनिधीत्त्व केले. अतिशय विनम्र आणि लोकांच्या मदतीसाठी कायम धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने एक मानवतावादी नेता आपण गमावला आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रश्न घेऊन त्यांच्याशी सातत्याने संवाद होत असे आणि प्रत्येकवेळी त्यांचा प्रतिसाद सकारात्मक असायचा. गरिब आणि वंचितांसाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. या महान नेत्याला माझी विनम्र श्रद्धांजली. त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांच्या दु:खात आपण सहभागी आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER