
- मद्रास हायकोर्टाने मनाई हुकूम उठविला
चेन्नई : योग गुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद या कंपनीस त्यांच्या एका औषधास ‘कोरोनिल’ हे नाव वापरण्यास करण्यात आलेली अंतरिम मनाई मद्रास उच्च न्यायालयाच्या व्दिसदस्यीय खंडपीठाने उठवली आहे. हे औषध कोरोनावर रामबाण इलाज असल्याचा दावा कंपनीने सुरुवातीस केला होता. मात्र नंतर कंपनीने या औषधाने रोग प्रतिकारशक्ती वाढत असल्याने कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी होते, अशी सारवासारव केली होती.
‘कोरोनिल’ हा आपल्या मालकीचा रजिस्टर्ड ट्रेटमार्क आहे, असा दावा करत चेन्नई येथील अरुद्र इंजीनियरिंग कंपनीने पतंजली कंपनीविरुद्ध दावा दाखल केला होता. त्यावर उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशाने ‘कोरोनिल’ हे नाव वापरण्यास पतंजली कंपनीस मनाई करणारा अंतरिम आदेश दिला होता. त्याविरुद्ध पतंजली कंपनीने केलेले अपील मंजूर करून न्या.आर. सुबय्या व न्या. एस. श्रावणन यांच्या खंडपीठाने तो मनाई आदेश उठविला.
पतंजली कंपनीचा युक्तिवाद मान्य करून खंडपीठाने म्हटले की, अरुद्र इंजीनियरिंग कंपनीच्या नावे जे ट्रेडमार्क रजिस्टर्ड आहेत ते ‘कोरोनिल ९२ बी’ व ‘कोरोनिल-२१३ एसपीएल’ असे आहेत. यात ‘कोरोनिल’ या शब्दासोबत येणारा अंक व अन्य अक्षरे या सर्वांचा मिळून एकच एकत्रित ट्रेडमार्क आहे. त्याममुळे यातील फफक्त ‘कोरोनिल’ या शब्दावर फक्त अरुद्र कंपनीचा हक्क आहे व तो शब्द अन्य कोणालाही वापरता येणार नाही, असे म्हणता येणार नाही. शिवाय दोन्ही कंपन्या पूर्णपणे भिन्न उत्पादन क्षेत्रातील असल्याने ‘कोरोनिल’ हे नाव पतंजली कंपनीने त्यांच्या औषधासाठी वापरल्याने अरुद्र कंपनीचया ग्राहकांची फसगत होण्याचीही काही शक्यता नाही.
अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला