वारकरी संप्रदायाचे रामदास जाधव कैकाडी महाराजांचे कोरोनामुळे निधन

Ramdas Jadhav Kaikadi

पंढरपूर : राज्यातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान, पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे विश्वस्त रामदास महाराज जाधव (Ramdas Jadhav) (कैकाडी) (७७) यांचे कोरोनामुळे शुक्रवारी निधन झाले. अकलूज येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रामदास महाराजांच्या निधनामुळे वारकरी (Warkari ) संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

रामदास महाराज जाधव ( कैकाडी) हे अहमदनगर येथील मूळ निवासी होते. पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर (Vitthal-Rukmini temple) समितीचे माजी सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते.

रामदास महाराज हे कैकाडी महाराजांचे पुतणे होत. तेच कैकाडी मठाचे व्यवस्थापन पाहात होते. रामदास महाराज मठाची जन्मकथा व तिचा उद्देश प्रभावीपणे सांगत. मठात वर्षभर विविध कार्यक्रम होत असतात.

मठ परंपरेला अपवाद
मठ प्रामुख्याने कुठल्याही एका देवाची अथवा महाराजांची उपासना करणारे असतात. मात्र, पंढरपूर येथील कैकाडी महाराजांचा मठ त्याला अपवाद आहे. कैकाडी महाराजांनी अनेक वर्षे जमिनीला पाठ न लावता ध्यानसाधना केली. त्यांचा भक्तसंप्रदाय वाढू लागला आणि गुरूंना काय देऊ असे विचारू लागला. त्यांनी भक्तांना नामजप लेखन देण्याचा आग्रह केला. त्यातही विशिष्ट नाम असा आग्रह नव्हता. ज्याचे जे उपासना दैवत असेल त्याचे नाम त्याने लिहावे व तो जपसंग्रह महाराजांना द्यावा, असे सुचवले. सहस्र कोटी नामजप त्यांच्याकडे संकलित झाला, असे सांगतात.

त्या नामजपाचे मंदिर उभारावे अशी इच्छा कैकाडी महाराजांनी त्यांचे धाकटे बंधू तुकारामकाका महाराज यांच्याकडे व्यक्त केली. तुकारामकाकांच्या कल्पनेतून तो वेगळ्या प्रकारचा मठ पंढरपुरात उभा राहिला. मठाचे बांधकाम जवळ जवळ आठ वर्षे चालले. चक्रव्यूहासारखा प्रदक्षिणा मार्ग व उजव्या बाजूला विविध पुतळे अशी चार मजली मठाची रचना आहे. एकदा मठात प्रवेश केला, की मध्येच प्रदक्षिणा सोडता येत नाही. सर्व दालने पार करूनच बाहेर पडता येते. त्‍यामुळे प्रदक्षिणेला काही तास लागतात.

प्रदक्षिणा किंवा दालनफेरी अगदी जलद करायची म्हटली तरी किमान ३५ ते ४५ मिनिटे लागतात. दालनांची सुरुवात मातृपूजेने होते. श्रीराम, परशुराम यांच्या मातांपासून. शिवाजी महाराज व महात्मा गांधी यांच्या मातांच्या प्रतिमा दालनात आहेत. रामायण, महाभारत, पुराणे, ऋषिमुनी ते भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील नेते या सर्वांना मठात स्थान आहे. ‘युनो’ची संसदही त्या दालनात आहे! नेहरू, पटेल, गांधी, सावरकर, इंदिरा गांधी यांच्यासोबत भीम-अर्जुन, आदिमानव, पुराणातील प्रसंग, वेद यांच्याही प्रतिमा मठात आहेत.

ही बातमी पण वाचा : कोरोना काळातले बालपण आणि भावविश्व !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER